शिवनेरी ते लेण्याद्री… ज्ञानयात्रेची दिमाखदार भरारी..!निमगाव व पटारेवस्ती शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात..५४ विद्यार्थ्यांचा इतिहासाशी थेट संवाद
श्रीरामपूर (वार्ताहर) – तालुक्यातील निमगाव खैरी येथील जि.प. प्रा. शाळा निमगाव व पटारेवस्ती शाळेची सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक सहल अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या सहलीत एकूण ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ला येथे भेट देत शिवरायांच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. किल्ल्यावरील महादरवाजा, गणेश दरवाजा, हत्ती दरवाजा, पीर दरवाजा, मेणा दरवाजा, कुलूप दरवाजा, धान्यकोठी (अंबारखाना), शिवजन्मस्थळ, बदामी टाके व शिवाईदेवी मंदिराची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सविस्तर दिली.तसेच अष्टविनायकांपैकी लेण्याद्री येथील गिरिजात्मज गणपती व बौद्ध लेणी तसेच ओझर गणपती मंदिर येथे विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी धार्मिक व सांस्कृतिक वारशाचा अभ्यास केला.शिवनेरी किल्ल्यावर विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या कार्याची महती पोवाडा व मनोगताद्वारे व्यक्त केली. इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. ही सहल त्यांच्या ज्ञानविश्वात नवा अध्याय जोडणारी ठरली असून शिवभक्ती व देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली.
सहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संतोष वाघमोडे, यशवंत बागुल, शिक्षिका प्रतिभा तोरणे, मीना निकम, सुधा गमे, पूजा पगारे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश तरस, उपाध्यक्षा सोनाली साबळे, पालक चैताली तरस, महेंद्र साबळे व सर्व समिती सदस्यांनी सहकार्य केले.या यशस्वी सहलीबद्दल सरपंच दत्तात्रय झुराळे, उपसरपंच विजयसिंग परदेशी, माजी उपसभापती नितीन भागडे, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, विस्तार अधिकारी दीपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर तसेच पालकांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.अत्यंत अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरलेली ही सहल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारी ठरली.
