Crime..कमरेला कट्टा..खिशात काडतुसे…स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात तरुणाचा खेळ संपुष्टात..!
अहिल्यानगर (नेवासा (प्रतिनिधी):-नेवासा तालुक्यात गावठी पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा (पिस्तूल) व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि समीर अभंग व पोलीस अंमलदार दिपक घाटकर,ह्रदय घोडके, सोमनाथ झांबरे,भिमराज खर्से, शाम जाधव,प्रशांत राठोड, मनोज साखरे,योगेश कर्डीले यांचे पथक नेवासा तालुक्यात माहिती संकलन करत होते.४ मार्च २०२६ रोजी सोनई पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे मोरेचिंचोरे गावच्या शिवारातील ओढ्याजवळ सापळा लावण्यात आला.तेथे संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव सतिष विश्वनाथ कसबे (वय ३०, रा. मोरेचिंचोरे ता. नेवासा जि. अहिल्यानगर) असे सांगितले.झडती दरम्यान त्याच्या कमरेला ३० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.प्राथमिक चौकशीत कसबे याने हे अग्निशस्त्र अमोल रावसाहेब विटनोर (रा.मांजरी ता. राहुरी जि.अहिल्यानगर) याच्या कडून घेतल्याचे सांगितले असून तो सध्या फरार आहे.या प्रकरणी पोलीस हवालदार सोमनाथ आसमानराव झांबरे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 86/2026 दाखल करण्यात आला असून आर्म्स ॲक्ट कलम 3/25 व 7 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.दरम्यान,स्थानिक गुन्हे शाखेने मागील एका महिन्यात ५ गावठी कट्टे व ९ जिवंत काडतुसे जप्त केली असून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यां विरोधात कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
