Crime..एमआयडीसीत संशयास्पद वावर..खुनाचा रक्तरंजित कट रचणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अग्नीशस्त्रासह खुनाचा कट रचल्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ताब्यात घेतले. ओंकार दयानंद पवार (वय २४, रा.गुलटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार,पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक–०२ कडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना माहिती देण्यात आली होती.कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे येथे गुन्हा क्रमांक १८४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ५५, ६१, ३(५) तसेच आर्म्स ॲक्ट ३/२५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३) १३५ अन्वये अग्नीशस्त्रासह खुनाचा कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून त्यातील आरोपी ओंकार पवार हा अहिल्यानगर परिसरात आल्याची माहिती मिळाली होती.

ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी ती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना कळविली.त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार दिपक घाटकर,विष्णू भागवत,फुरकान शेख,शामसुंदर जाधव,योगेश कर्डीले,प्रशांत जाधव तसेच महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचा समावेश होता.
पथकाने एमआयडीसी परिसरात आरोपीचा शोध सुरू केला असता शिवाजीनगर येथील अमरदीप पेट्रोल पंपाजवळ एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला.पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव ओंकार दयानंद पवार (वय २४, रा. गुलटेकडी, पुणे) असे सांगितले.यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता त्याने संबंधित गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – ०२ यांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा, युनिट – ०५, पुणे शहर करीत आहे.
