शिर्डी गॅस बचतीसाठी संस्थांनचा मोठा निर्णय..तात्पुरती कपात..आता एकच लाडू
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गॅस टंचाईचा परिणाम आता Shirdi Sai Baba Temple येथील प्रसाद व्यवस्थेवरही झाला आहे. इंधन बचत आणि वाढत्या गॅस वापराच्या पार्श्वभूमीवर Shri Saibaba Sansthan Trust प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून,आजपासून साईभक्तांना मिळणाऱ्या प्रसादातील लाडूंची संख्या कमी करण्यात आली आहे.यापूर्वी साईभक्तांना प्रसादाच्या एका पाकिटामध्ये दोन लाडू दिले जात होते.मात्र गॅसच्या वाढत्या वापरामुळे आणि सध्याच्या टंचाईच्या परिस्थितीमुळे आता एका पाकिटात एकच लाडू देण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे साईप्रसाद घरी घेऊन जाणाऱ्या अनेक भक्तांमध्ये काहीशी निराशा दिसून येत आहे.

मंदिरात दररोज मोठ्या प्रमाणावर प्रसादाची तयारी केली जाते.साईसंस्थानच्या माहितीनुसार दररोज सुमारे ४५ हजार लाडूंच्या पाकिटांची विक्री केली जाते,तर ५० हजार बुंदीच्या पाकिटांचे मोफत वितरण साईभक्तांना केले जाते. या मोठ्या प्रमाणातील प्रसाद तयारीसाठी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.सध्याच्या परिस्थितीत गॅस टंचाई जाणवत असल्याने इंधनाची बचत करण्याच्या उद्देशाने संस्थानने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.संस्थान प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,हा बदल पूर्णपणे तात्पुरता असून गॅस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच प्रसादाच्या पाकिटात दोन लाडू देण्याची व्यवस्था सुरू केली जाईल.
साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भक्त शिर्डीत येत असतात. दर्शनानंतर प्रसाद म्हणून मिळणारा लाडू हा साईभक्तांसाठी श्रद्धेचा आणि आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे लाडूंची संख्या कमी झाल्याने काही भक्तांनी नाराजी व्यक्त केली असली तरी परिस्थिती लक्षात घेऊन बहुतेक भक्तांनी संस्थानच्या निर्णयाला समजून घेत सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.सध्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर साईसंस्थानकडून इंधन बचत आणि व्यवस्थापनावर अधिक भर दिला जात असून,भक्तांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
