एमआयडीसी परिसरात घरगुती गॅसचा काळाबाजार उघड..संयुक्त पथकाच्या धाडीत ९ सिलिंडर जप्त..अन्नधान्य वितरण विभागाची धडक कारवाई तब्बल ५९ हॉटेल्स व ६ गॅस एजन्सींची तपासणी..
अहिल्यानगर (दि.१३ मार्च प्रतिनिधी):-शहरातील एमआयडीसी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृत साठा करून त्याचा व्यावसायिक वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्नधान्य वितरण विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक टाकलेल्या धाडीत ९ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. घरगुती गॅसचा काळाबाजार आणि गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई केली.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी सातत्याने तपासण्या सुरू असून त्याच मोहिमेअंतर्गत एमआयडीसी परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली.तपासणी दरम्यान घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलिंडर अनधिकृतरीत्या साठवून ठेवून त्याचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी ९ सिलिंडर ताब्यात घेण्यात आले. जिल्हाभरात सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत आतापर्यंत ५९ हॉटेल्स तसेच ६ गॅस वितरक संस्थांची तपासणी करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईदरम्यान एकूण ११ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.प्रशासनाच्या माहितीनुसार, घरगुती वापरासाठी दिले जाणारे गॅस सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी वापरणे अथवा त्याचा अनधिकृत साठा करून ठेवणे हे नियमबाह्य आहे. अशा प्रकारामुळे सर्वसामान्य ग्राहकांना गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गैरप्रकारांविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
ही कारवाई नगर शहराच्या अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते, नगर तालुक्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी शिवराज पवार, राहुरीचे पुरवठा निरीक्षण अधिकारी सुदर्शन केदार, बीपीसीएल कंपनीचे जिल्हा समन्वय अधिकारी राजकुमार मिश्रा, नगर शहराचे पुरवठा निरीक्षक तेजस पाटील, महसूल सहाय्यक अक्षय एकशिंगे तसेच वाहनचालक योगेश शहाणे यांच्या संयुक्त पथकाने केली.दरम्यान, जिल्ह्यातील गॅस वितरण व्यवस्था सुरळीत राहावी आणि घरगुती गॅसचा गैरवापर थांबवण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अनधिकृत साठा किंवा घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
