मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘पोलीस दीदी’ महत्त्वाची एसपी सोमनाथ घार्गे..पोलिसांनी अधिक संवेदनशीलता दाखवली तर छेडछाड-अत्याचाराचे गुन्हे वेळीच रोखता येतील प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन
अहिल्यानगर ,(दि.१३ मार्च प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्हा हा संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो.जिल्ह्यात गुन्हेगारी आणि अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत.विशेषत:बालकांवरील अत्याचाराच्या घटना कमी होत नसल्याची चिंताजनक बाब आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी अधिक संवेदनशीलता दाखवली, तर मुलींवरील अत्याचार व छेडछाडीचे प्रकार वेळेत रोखता येऊ शकतात,असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.
स्नेहालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पोलीस दीदी प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.या कार्यशाळेत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पोलीस दीदी आणि संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड,उपशिक्षणाधिकारी पोपट धामणे, स्नेहालयचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी, युवानिर्माण प्रकल्पाचे संचालक डॉ. विनय कोपरकर,स्नेहाधार प्रकल्पाचे संचालक ॲड.श्याम आसावा तसेच भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक प्रियंका आठरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक घारगे पुढे म्हणाले की, शाळकरी मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. या घटना रोखण्यासाठी ‘पोलीस दीदी’सारखे उपक्रम जिल्ह्यात व्यापक प्रमाणावर राबवणे अत्यंत आवश्यक आहे. मुलींचा पाठलाग करणे,छेडछाड करणे यांसारख्या घटनांची वेळीच गंभीर दखल घेतली,तर पुढे होणारे गंभीर गुन्हे टाळता येऊ शकतात.पोलिसांनी केवळ बंदोबस्त किंवा गुन्ह्यांचा तपास करण्यापुरते मर्यादित न राहता अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक,पालक आणि विद्यार्थिनी यांना विश्वासात घेऊन पोलीस दीदींनी काम केले, तर लैंगिक अत्याचाराच्या घटना निश्चितपणे कमी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पोलीस दीदी संकल्पना आणि कायदेयावेळी ॲड.श्याम आसावा यांनी ‘पोलीस दीदी’ संकल्पना आणि बालकांशी संबंधित कायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली.बालकांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दीदी या त्यांच्या संरक्षक, मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करणार आहेत. वेळेवर मदत न मिळाल्यास बालकांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.अशा वेळी पोलीस दीदी त्यांना आवश्यक ती मदत आणि मार्गदर्शन देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.बालकांशी संवाद कसा साधावा
डॉ. विनय कोपरकर यांनी बालकांशी संवाद साधताना कोणकोणत्या माध्यमांचा वापर करावा याबाबत मार्गदर्शन केले. मुलांना मोकळेपणाने बोलण्यासाठी खुले प्रश्न विचारणे गरजेचे असते.असे प्रश्न विचारल्यास मुले अधिक बोलकी होतात आणि त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडविण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
संकटग्रस्त मुलांशी संवाद आणि समुपदेशन
डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी संकट आणि आघातग्रस्त मुलांशी संवाद साधताना आवश्यक असलेल्या समुपदेशन पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. मुलांच्या मनातील तणाव समजून घेणे, त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणे आणि त्यांचा विश्वास जिंकणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांशी साधी, सोपी आणि मैत्रीपूर्ण भाषा वापरावी, स्वतः कमी बोलून मुलांचे अधिक ऐकावे, त्यांच्या भावनांना मान्यता द्यावी आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची गोपनीयता राखावी, असे त्यांनी सांगितले. तसेच शाळेतील शिक्षक आणि समुपदेशक यांच्यासोबत समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बालकांच्या मानसिक व भावनिक स्थितीवर मार्गदर्शन
डॉ. तेजस्विनी मिस्कीन यांनी बालकांच्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर मार्गदर्शन केले. भीती, अस्वस्थता, एकटेपणा, लाज किंवा अपराधीपणाची भावना यांसारख्या मानसिक स्थिती बालकांमध्ये दिसू शकतात. तसेच चिंता, राग अनावर होणे किंवा वर्तनातील बदल अशा समस्याही आघातानंतर निर्माण होऊ शकतात. या बदलांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांना योग्य मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या घोरपडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संतोष धर्माधिकारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ दाभाडे,रुपाली सोयम, मंदाकिनी मोकळ, विकास सुतार, प्रविण कदम, विनायक महाले, प्रियंका कोंगळ, सागर भिंगारदिवे, देव मोदी आणि आयुषा जाधव आदींनी परिश्रम घेतले.
