Crime…न्यायालयीन खटला मागे घे म्हणत महिला वकिलावर भररस्त्यात हल्ला..गळा आवळून केस कापत जीवे मारण्याची धमकी..कुठे घडला हा प्रकार वाचा सविस्तर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड परिसरात एका महिला वकिलाला अडवून दोन अनोळखी इसमांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या हल्ल्यात महिलेचा गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.एवढेच नव्हे तर आरोपींनी कात्रीने त्यांचे केस कापत दहशत निर्माण केली.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला वकील आपल्या मुलाला आणण्यासाठी दुचाकीवरून जात असताना सावेडीतील ऑक्झिलीयम शाळेजवळ ही घटना घडली.दोन अज्ञात इसमांनी दुचाकी आडवी लावून त्यांना थांबवले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “शेजाऱ्यां विरोधातील न्यायालयीन खटला मागे घे, अन्यथा तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी त्यांच्या गळ्यातील ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला.यानंतर एका आरोपीने खिशातील कात्री काढून महिलेचे केस कापले व “पुढच्या वेळी तुझा गळा कापू,” असा दम देत दोघेही तेथून पसार झाले.
या प्रकरणी विवेक घोडके, सोनिया घोडके आणि दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करत आहेत. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
