Crime..ऑनलाईन ट्रेडिंगचा सापळा नफ्याच्या आमिषाने ३.५० लाखांचा डल्ला..ॲपवर नफा दिसला..खात्यात मात्र शून्य पैसे..! तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका खासगी नोकरदाराची ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक crime झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.विश्वास संपादन करून,बनावट ॲपच्या माध्यमातून नफा दाखवत अखेर मोठी रक्कम उकळण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.फिर्यादी हे एका खासगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून कार्यरत असून,८ मे २०२४ रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून “मेघा शर्मा” नावाच्या महिलेचा फोन आला.तिने शेअर ट्रेडिंगमधून अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत संवाद सुरू केला.
हळूहळू विश्वास संपादन करत संबंधित व्यक्तीला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. त्या ग्रुपमध्ये ट्रेडिंगविषयी मार्गदर्शन दिले जात असल्याने सुरुवातीला त्यांनी अल्प रकमेची गुंतवणूक केली. काही दिवसांतच ॲपवर नफा दिसू लागल्याने त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला.यानंतर आरोपींनी त्यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये जोडून एक विशेष ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.जून ते जुलै २०२४ दरम्यान फिर्यादीने वेगवेगळ्या तारखांना एकूण ३ लाख ५० हजार रुपये संबंधित खात्यांमध्ये जमा केले.मात्र, ॲपवर नफा दिसत असतानाही प्रत्यक्ष पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता विड्रॉल होत नसल्याचे लक्षात आले.तेव्हाच आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली.
घटनेनंतर पीडिताने ३ जुलै आणि १६ जुलै २०२४ रोजी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर स्वतंत्र तक्रारी नोंदवल्या.त्यानंतर २१ मार्च २०२६ रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली.पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली आहेत.नागरिकांसाठी इशाराऑनलाईन ट्रेडिंग,क्रिप्टो किंवा गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.अनोळखी व्यक्ती,व्हॉट्सॲप ग्रुप किंवा संशयास्पद ॲपवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
