एमआयडीसीतील सनफार्मा चौकातील रेणुका माता कमान काढण्याचे प्रशासनाचे आदेश..
अहिल्यानगर (दि.२३ प्रतिनिधी):- नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सनफार्मा चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रेणुका माता कमान काढून घेण्याचे तात्पुरते सशर्त आदेश उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी जारी केले आहेत, तसेच यावर प्रभावित नागरिकांना १ एप्रिल २०२६ पर्यंत आपल्या हरकती नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
औद्योगिक वसाहत परिसरातून चौकात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना या कमानीमुळे मोठा अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत होता. या कोंडीमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच नवनागापूर परिसरात सार्वजनिक उपद्रव होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या व्यक्तींना या निर्णयाबाबत हरकत घ्यायची असेल त्यांनी १ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडावी. विहित मुदतीत कोणतीही हरकत प्राप्त न झाल्यास अथवा योग्य कारणे न दिल्यास हा आदेश अंतिम केला जाईल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर किंवा अडथळा निर्माण करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
