Torch of Education..शिक्षणाची मशाल घराघरात पोहोचवणे हीच फुलेना खरी श्रद्धांजली..रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने औरंगपुऱ्यात महात्मा फुलेंना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या स्मारकास ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजसुधारणेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.
क्रांतीकारी विचारांना दिला उजाळा
अभिवादन प्रसंगी बोलताना पक्षाचे पक्षप्रमुख राजुभाई साबळे म्हणाले की, “महात्मा फुले यांनी विषमतेच्या अंधकारात शिक्षणाची मशाल पेटवली.त्यांनी दिलेले योगदान केवळ एका समाजासाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे क्रांतीकारी विचार घराघरात पोहोचवणे आणि त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.”
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर खंडारे यांची उपस्थिती होती. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती आणि जिल्हा सरचिटणीस रविकांत मोरे यांनीही आपले विचार व्यक्त करत महात्मा फुले यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
यावेळी नवनियुक्त शहराध्यक्ष संतोष उनवणे, ऑटो युनियन शहराध्यक्ष प्रदीप धनेधर, अशोक गायकवाड, हन्नु नाना, राजू उजगरे, अमित साळवे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. औरंगपुरा परिसर ‘महात्मा फुले यांचा विजय असो’ अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता.
