City Traffic Police..शहर वाहतूक विभागाचा कारभार वाऱ्यावर..! ‘सह्याद्री छावा’ संघटनेचा भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप..मुख्यमंत्र्यांकडे तक्रार..१७ एप्रिलला नाशिक येथे ‘अर्धन्ग्न’ आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था आणि वाहतूक शाखेतील वाढता भ्रष्टाचार यावरून आता मोठे रणकंदन माजण्याची शक्यता आहे.शहर वाहतूक विभागाचा कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला असून,येथे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार जोरात सुरू असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेने केला आहे. यासंदर्भात संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक विभाग) यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
खाजगी वसुली आणि मर्जीतील कर्मचारी
संघटनेने निवेदनात म्हटले आहे की,वाहतूक विभागाच्या आशिर्वादाने शहरात खाजगी वाहतुकीला खुलेआम रान मोकळे करून दिले आहे.’हप्ते वसुली’चा प्रकार इतका टोकाला गेला आहे की,काही ठराविक आणि मर्जीतील कर्मचाऱ्यांनाच महत्त्वाचे ‘पॉईंट’ दिले जातात. धक्कादायक बाब म्हणजे, वाहतूक शाखेच्या कार्यालयातच हप्तेखोर एजंटांचा वावर वाढला असून,यामुळे सर्वसामान्यांची लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अपघातांचे सत्र आणि पोलिसांची प्रतिमा मलीन
शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही ही वाहने दिवसाढवळ्या शहरात कशी येतात? असा सवाल उपस्थित करत संघटनेने काही भीषण घटनांची आठवण करून दिली आहे:टिळक रोड:विना नंबरच्या डंपरने एका शिक्षकाचा बळी घेतला,ज्याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
शेंडी बायपास आणि केडगाव बायपासवर पोलीस तैनात असतानाही अवजड वाहने शहरात घुसतातच कशी? पुणे बस स्थानक परिसरात खाजगी वाहनांचे एजंट प्रवाशांना अक्षरशः ओढून नेतात, मग पोलीस नक्की करतात काय? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी
“वाहतूक शाखेच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची खातेनिहाय चौकशी व्हावी, त्यातून अनेक सत्य बाहेर येईल,” अशी मागणी संघटनेने केली आहे. गुन्हे दाखल होऊनही वाहने फरार होतात, यामुळे पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
आंदोलनाचा इशारा
जर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली नाही आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर १७ एप्रिल २०२६ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांच्या दालनासमोर ‘अर्धन्ग्न आंदोलन’ करण्याचा इशारा रावसाहेब काळे यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
