हिवरगाव पावसा येथे समतेचा जागर! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे दिमाखदार आयोजन..९० च्या दशकापासून सुरू असलेली ‘संयुक्त जयंतीची’ प्रदीर्घ परंपरा यंदाही कायम.. भीमशक्ती तरुण मित्र मंडळाचा पुढाकार
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे केवळ एका विशिष्ट चौकटीत मर्यादित नसून,समता,बंधुत्व आणि आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी त्यांनी दिलेले योगदान अजरामर आहे.याच विचारांचा वारसा जपत, संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे ९० च्या दशकापासून सुरू असलेली सर्वधर्मसमभावाची ‘संयुक्त जयंती’ परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना एकत्रित अभिवादन करण्यासाठी भीमशक्ती तरुण मित्र मंडळाने या महोत्सवाचे भव्य आयोजन केले आहे.
महोत्सवाचे मुख्य आकर्षण आणि कार्यक्रम:
येत्या १४ एप्रिल रोजी गावात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे:
भव्य मिरवणूक: सायंकाळी ठीक ५:०० वाजता पारंपारिक वाद्यांच्या गजरात महापुरुषांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
अभिवादन सभा: रात्री ८:०० वाजता बुद्ध वंदना घेऊन महापुरुषांना मानवंदना दिली जाईल.
स्नेहभोजन: महोत्सवानिमित्त सर्व ग्रामस्थांसाठी सामूहिक स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गावात उत्साहाचे वातावरण
जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण हिवरगाव पावसा परिसर उजळून निघाला आहे. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, प्रमुख चौकांमध्ये महापुरुषांच्या विचारांना साजेसी सुंदर सजावट करण्यात आली आहे.”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसमावेशक आहेत, म्हणूनच सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन ही जयंती साजरी करण्याची परंपरा आम्ही जपली आहे,” असे आयोजकांनी सांगितले.
उपस्थितीचे आवाहन:
या संयुक्त जयंती महोत्सवास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भीमशक्ती तरुण मित्र मंडळ, सरपंच व ग्रामपंचायत हिवरगाव पावसा, तसेच सर्व संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी केले आहे.
