नगरच्या कमलनयन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये निरोगी व्यक्तीवर खासगी व्यक्तीकडून उपचार;थेट ‘आयसीयू’त भरती करून सलाईनही लावले!याचे व्हिडिओ,लेखी पुरावे आता आपण कोर्टातच सादर करू सोमनाथ शिंदे यांचा इशारा
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१७ जुलै):-सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शिंदे यांनी केलेल्या एका ‘स्टिंग ऑपरेशन’ मधून धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. नगरच्या कमलनयन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दोन खासगी व्यक्तीने ते डॉक्टर नसतानाही शिंदे यांच्यावर वैद्यकीय उपचार केले.इतकेच नाही तर शिंदे यांना सलाईन लावत थेट अतिदक्षता कक्षात (आयसीयू) भरती करण्यात आले. जेव्हा,की शिंदे हे निरोगी व ठणठणीत होते. त्याचा ईसीजीही काढण्यात आला,व महागडे वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. ही बाब त्यांनी पत्रकाराच्या कानावर घातली असता,या स्टिंगचे बिंग फुटले आणि त्यांनी थेट महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. आरोग्य अधिकार्यांनी सुनावणी घेऊन संबंधित हॉस्पिटलला क्लीनचिट तर दिलीच;पण सोमनाथ शिंदे यांनाच तुम्ही ‘स्ंिटग ऑपरेशन’ करण्यापूर्वी परवानगी घेतली नाही,असा अजब सवाल केला.आता बोगस डॉक्टर,व ठणठणीत माणसालाची थेट ‘आयसीयू’त पाठविल्याप्रकरणी कोर्टात धाव घेणार असून, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.बोरगे व कमलनयन हॉस्पिटलचे संचालक डॉ.शेंडगे यांच्यावर कारवाईची विनंती कोर्टाला करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शिंदे यांनी दिला आहे.या संदर्भात सोमनाथ शिंदे यांनी अहमदनगर महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांकडे रितसर तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनुसार,ते ठणठणीत व निरोगी असतानाही केवळ सामाजिक भावनेतून कमलनयन हॉस्पिटल येथे चालत असलेल्या गैरप्रकाराचा पर्दाफास करण्यासाठी त्यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ राबविले.ते स्वतःबनावट रूग्ण बनून या हॉस्पिटलमध्ये गेले. तर त्यांना तेथील प्रशांत जाधव व अन्य एक व्यक्ती यांनी शिंदे यांची विचारपूस केली.’आपल्या छातीत दुखत असून,बरे वाटत नाही’,असे शिंदे यांनी या दोघांना खोटेच सांगितले. तर प्रशांत जाधव व अन्य एका व्यक्तीने शिंदे यांना तातडीने एक गोळी चघळण्यास देऊन लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले.ईसीजी काढला व लगेचच आयसीयूमध्ये भरती केले.तेथे सलाईन लावून त्यातून काही तरी औषधी सोडण्याचा प्रयत्न चालविला असताना,शिंदे यांनी याबाबत पत्रकारास माहिती दिली व बोलावून घेतले.तसेच,या हॉस्पिटलचे संचालक डॉ.शेंडगे यांनाही फोन करत आपण ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्याची कल्पना दिली.त्यामुळे डॉ.शेंडगे यांनी त्या दोन खासगी व्यक्ती व नर्सला ट्रिटमेंट थांबविण्याची सूचना केली.याबाबतचे सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शिंदे यांनी केले असल्याचे सांगितले. दोन खासगी व्यक्ती एखाद्या रूग्णाला तपासणे, त्यांनी रूग्णाला गोळी चघळण्यास देणे,व लगेचच ईसीजी काढून आयसीयूमध्ये भरती करून घेणे,हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याने सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शिंदे यांनी या प्रकाराची लेखी तक्रार महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांच्याकडे केली.तसेच, कमलनयन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाईची मागणी केली.या तक्रारीवरून आरोग्य अधिकारी यांनी हॉस्पिटलला नोटीस काढत,म्हणणे सादर करण्यास सांगितले.तसेच,या संदर्भात सुनावण्या घेऊन दोन्ही बाजू ऐकून घेतल्यात. तक्रारदार सोमनाथ शिंदे यांनी आपल्याकडील सर्व पुरावे सादर केले.तर,कमलनयन हॉस्पिटलने हे आरोप फेटाळून लावत,सोमनाथ शिंदे हे आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेच नाहीत.आपल्याकडे प्रशांत जाधव व अन्य एक व्यक्ती कामाला नाहीत.आदी कारणे देत तक्रारअर्ज निकाली काढण्याची विनंती केली.अंतिम सुनावणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरगे यांनी आपला निकाल दिला, व त्यात कमलनयन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला क्लीनचिट दिली.या निकालानुसार,सोमनाथ शिंदे यांनी या हॉस्पिटलमध्ये अधिकृतरित्या उपचार घेतल्याचे अथवा ‘स्टिंग ऑपरेशन’ राबविल्याचे दिसून येत नाही,आणि सोमनाथ शिंदे यांनी असे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यापूर्वी कायदेशीर परवानगी घेतली नाही,तसेच संबंधित प्राधिकरणास आगावू तक्रार किंवा कल्पना दिली नाही, असे निष्कर्ष नोंदविले आहेत. त्यामुळे ‘स्टिंग ऑपरेशन’ राबवून एखादा गैरप्रकार उघडकीस आणण्यापूर्वी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते, असा नवाच जावईशोध नगर महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांनी लावल्याचे या निकालातून दिसून येत आहे.
दरम्यान,यासर्व प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून,आपल्याकडे सबळ पुरावे आहेत. महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांनी कमलनयन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवर कारवाई न करता,’अर्थ’पूर्ण व्यवहारातून पाठीशी घातले असावे,असा संशय व्यक्त करत,आपण डॉ. बोरगे व डॉ. शेंडगे यांच्याविरोधात कोर्टात जाणार असून,न्यायालयात दाद मागत या दोघांवरही कायदेशीर कारवाईची विनंती करणार आहोत,असे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. याबाबतचे व्हिडिओ,लेखी पुरावे आता आपण कोर्टातच सादर करू, असा निर्वाणीचा इशाराही सोमनाथ शिंदे यांनी दिला आहे.