Maharashtra247

अहमदनगरच्या स्टार्टअपचा कृषी क्षेत्रात डंका;केंद्र सरकारकडून १८ लाख रुपये निधी प्रदान

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.३१ जुलै):-पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील बायोमी टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या शेती-संशोधन करणाऱ्या संस्थेची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. या संस्थेने निर्मिती केलेल्या आणि शेतकर्यांना फायदेशीर असणाऱ्या ‘सोईलोमीटर’ या प्रोडक्टची स्टार्टअप अंतर्गत निवड झाली आहे. राष्ट्रीय कृषी विस्तार योजनेतून या स्टार्टअप साठी 18 लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रीय कृषी विपन्न संस्था नियम, जयपूर यांच्यामार्फत हा निधी देण्यात आला असून सदरच्या स्टार्टअपमध्ये सोईलोमीटर हे कीट विकसित केले आहे. या सोईलोमीटर कीटच्या माध्यमातून शेतकरी बांधव स्वतः बांधावर मातीचे जैविक परीक्षण करू शकतील. तसेच कृषी निविष्ठांचा वापर आणि दर्जा याबाबतही शेतकरी बांधव सजग होऊ शकतील.मातीचा जिवंतपणा तपासण्यासाठी कोणत्याही प्रयोगशाळेत न जाता, आपल्या शेताच्या बांधावर केवळ तीन तासात आणि तिनशे रुपयांत ही तपासणी करण्यासाठीचा ‘साॅईलोमीटर’ नावाचा संच विकसित करण्याचे काम डाॅ. प्रफुल्ल गाडगे यांनी केले आहे. बायोमी टेक्नाॅलाॅजीज या आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून डाॅ गाडगे त्यांची उत्पादने आणि सेवा शेतकऱ्यांसाठी विकसित करीत असून राज्य सरकारांपासून ते विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना याबाबत ते सल्लागार म्हणून सेवासुद्धा पुरवत आहेत.या सोईलोमीटर कीटचे अनावरण केंद्रीय कृषीमंत्री.श्री.नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते झाले आहे. या कीटचा देशातील शेतकरी बांधवाना उपयोग होईल आणि हे कीट प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.मातीची पुनर्भरणा होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाले आहे आणि शेतकऱ्यांनाही त्याबाबतचे पुरेसे ज्ञान नाही. याबाबत शासनाने साॅईल हेल्थ कार्डचा उपक्रम हाती घेतला आहे, मात्र यात जैविक तपासणी होत नाही आणि प्रयोगशाळेची गरज भासते तसेच त्यासाठी तीन दिवसांचा कालावधी आणि दहा हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. या प्रयोगशाळा मोठ्या शहरांमध्येच आहेत आणि सर्वसाधारण साॅईल टेस्टिंग लॅब्समध्ये या चाचण्या होतच नाही. मग शेतकऱ्यांना हे सगळं कळणार कसं आणि जनजागृती कशी होणार? मातीतील अन्नद्रव्यांची तपासणी करून त्या अन्नद्रव्यांना पचविण्यासाठी, त्याची पिकासाठी योग्य उपलब्धता करून देण्यासाठी सूक्ष्म जिवाणूंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.त्यासाठी आम्ही देशातलं पहिले असे मातीचा जिवंतपणा तपासण्याचं किट बनविले व त्याचे नाव साॅईलोमीटर असे ठेवले आहे. साॅईलोमीटरद्वारे मातीचा जिवंतपणासह मायक्रोफ्लोरा किती आहे हे शेतकऱ्यांना समजेल व त्यातून मातीचे नियोजन करणे शक्य होईल. तसेच आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सल्लागार सेवा पुरवू शकू,” असे डाॅ गाडगे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page