नान्नजच्या खंडोबा मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली..!!पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची गरज नागरिकांची मागणी
संगमनेर (दत्तात्रय घोलप/राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुका हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून रात्रीच्या सुमारास घरफोडी व मंदिरातील दानपेटी चोरीचे प्रमाण जास्त वाढले आहे.
अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील भावीक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दुमाला गावच्या हद्दीत असणारे खंडोबा महाराज देवस्थान नावलौकिक प्राप्त झालेले आहे.या देवस्थानच्या मंदिरात असणारी दानपेटी अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडून त्यातील असणारे पैसे चोरून नेत पोबारा केला आहे.याठिकाणी सुरू असलेल्या सर्व सभामंडप कामाचे काही साहित्य देखील चोरट्यांनी चोरून नेले.तसेच येथून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या झोडगे वस्तीवरील भीमाशंकर महादेव मंदिरातील दरवाजाचे कुलूप तोडून कलश चोरून नेला आहे.संगमनेर तालुका पोलीसांनी याठिकाणी भेट देत पाहणी केली.या परिसरात पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.या घटनेमुळे परिसरातील नागरिक अत्यंत भयभीत झाले असून त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे.
या घटने विषयी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनकर चत्तर व नान्नज दुमाला ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कैलास बाचकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत रात्री पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे अशी मागणी केली आहे.