अहमदनगर (दि.११ ऑगस्ट):-निरीक्षण गृह व बालगृहातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाच्या सर्वच घटकांनी हातभार लावणे गरजेचे आहे.

सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्या प्रती संवेदनशील असले पाहिजे,असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कॅटलिस्ट फॉर सोशल ॲक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय निरीक्षण गृह व बालगृहातील मुला-मुलींनी तयार केलेल्या राख्या व वस्तूंचे प्रदर्शनाचे शुक्रवारी (दि.९) जिल्हा न्यायालयाच्या आवारात उदघाटन करण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा या प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी,मालती यार्लगड्डा या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील,न्यायिक अधिकारी,अहमदनगर बार असोसिएशनचे सचिव ॲड.संदिप शेळके,अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशनचे सचिव ॲड.योगेश काळे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील,कॅटलिस्ट फॉर सोशल ॲक्शन या संस्थेच्या लुई मॅथ्यूज, जुई झावरे,दोन्ही वकील संघातील विधिज्ञ,न्यायालयीन कर्मचारी हे उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय देखील निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोबत उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले. सर्वांनी मनाचे औदार्य दाखवून मुला-मुलींनी बनविलेल्या राख्या व वस्तू विकत घेऊन त्यांना उभारी देण्याचे आवाहन केले. सर्व न्यायिक अधिकारी,दोन्ही वकील संघातील विधीज्ञ,न्यायालयीन कर्मचारी,पक्षकार यांनी विविध वस्तूंची खरेदी करून निरीक्षण गृह व बालगृहातील मुला-मुलींना प्रोत्साहन दिले.ॲड.सुनील मुंदडा यांनी सूत्रसंचालन केले.ॲड.भक्ती शिरसाठ यांनी आभार मानले.
राज्यात तिसरा क्रमांक
राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्ह्यामध्ये ६४ हजार ७२२ प्रकरणे निकाली निघाले आहेत.यामध्ये १३८ कोटी २२ लाख ५१ हजार ३०४ रुपयांची वसुली झाली.राज्यात अहमदनगर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या उच्चांकी कामगिरीबद्दल अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांचा सत्कार केला.
