दाहक स्थितीतील रेणुकाला मिळाली स्नेहालयामुळे प्रेमाची सावली
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुक्यातील एका गावातील १३ वर्षांची कु.रेणुका (बदललेले नाव ) जन्मापासूनच शारीरिक आणि मानसिक विकलांग आहे.तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या निधनामुळे अनाथ झाल्यावर तिची अवस्था एकाकी आणि पशुवत झाली. स्नेहालय संस्थेच्या स्नेहाधार प्रकल्पाने रेणुकाचे जीवन आणि भविष्य बदलण्याचा संकल्प केला.
कोल्हापूर येथील समाजसेवक किशोर देशपांडे यांनी स्थापन केलेल्या सावली केअर होमशी संवाद आणि समन्वय करून रेणुकाचे उपचार,पुनर्वसन आणि संरक्षणाची स्थायी व्यवस्था सावली संस्थेत कालच करण्यात आली. बेवारस रेणुकाबद्दल नेप्ती येथील ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने स्नेहालय संस्थेच्या स्नेहाधार प्रकल्पाला कळवले. तिच्यासाठी अनुरूप संस्थेचा शोध स्नेहाधार प्रकल्पाने सुरू केला.कोल्हापूर येथील सावली केअर होमचे किशोर देशपांडे यांनी रेणुकाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली.अहिल्यानगर जिल्ह्यात विशेष गरजयुक्त रेणुकासाठी विशेष बालगृह नाही. त्यामुळे अहिल्यानगरच्या बालकल्याण समितीने स्नेहाधार प्रकल्पास इतरत्र रेणुकाला स्वीकारणारी संस्था शोधायला सांगितली.कोल्हापूर येथील सावली केअर होम संस्थेने रेणुकाच्या स्वीकाराची तयारी स्नेहाधार प्रकल्पाकडे दर्शवली. अहिल्यानगर बालकल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओहोळ आणि सदस्यांनी या कामी तत्परतेने कायदेशीर पूर्तता करून दिल्या.कोल्हापूर जिल्हा बालकल्याण समितीचे सहकार्य मिळवून सावली केअर होम येथे रेणुकाला दाखल करण्यात आले.स्नेहाधार टीममधील प्रवीण मुत्याल, विद्या घोरपडे आदींनी या कामी समन्वय करून सावली संस्थेत रेणुकाला कायमचे पुनर्वसित केले.
