समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये: न्या.भाग्यश्री पाटील;महाविद्यालयात विधी सहाय्य कक्षाचा शुभारंभ
अहमदनगर (ता.२० ऑगस्ट):-आपल्या देशात साधू-संतांची मोठी परंपरा आहे. साधू-संतांनी नितीमत्ता,सदगुण समाजातील प्रत्येक घटकांमध्ये रूजविले.समाजात या नितीमुल्यामुळेच सुख-शांती होती. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, नैतिकमूल्याची घसरण, व्यसनाधिनता या सारख्या कारणांमुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे.
तरूणांचे प्रमाण यामध्ये वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे.त्यांच्या हातामध्ये बेड्या पडत आहेत. तरूणांच्या हातामध्ये नवनिर्मिती क्षमता आहे.समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये आहे.जीवन जगत असताना इतरांच्या दुःख, वेदना समजावून त्या कमी केल्यास निकोप आणि सुदृढ समाजाची निर्मिती होईल,असे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरणाच्या जिल्हा सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटिल यांनी केले.कलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थींचे मनोबल वाढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदे विषयक जागृती शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या नेप्ती (ता.नगर) येथील श्री छत्रपती शिवाजीमहाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२०) आयोजित केलेल्या कायदे विषयक जागृती शिबिरात न्यायाधीश पाटील बोलत होत्या.प्राचार्य डॉ.वाय.आर. खर्डे अध्यक्षस्थानी होते.न्यायाधीश पाटिल म्हणाल्या की, संतांच्या प्रबोधनामुळे समाजाला दिशा मिळत होती.संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे’ असे सांगून पर्यावरण संवर्धनाचे महत्व सांगितले.आता वृक्षतोडीला प्रतिबंध करण्यासाठी कायदे करावे लागत आहेत. समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कायदे करून उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी लागते. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. भारतीय दंड संहिता १९६० मधील कायद्यात आता काळानुसारसुधारणा करण्यात आली आहे. कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः महिला अत्याचाराबाबत जन्मठेप, फाशीपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. सदविवेक बुद्धी म्हणजेच कायदा असतो.
त्यामुळे कोणीही मला कायदा माहित नाही, या गुन्ह्यासाठी एवढ्या कठोर शिक्षेची तरतूद आहे, असा बचाव करू शकत नाही. आपल्या हातून कोणताही गुन्हा घडणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन केले. सोशल मीडियाचा वापर करताना कोणाच्याही धार्मिक भावना, खासगी जीवनाचे उल्लंघन होणार नाही, याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पोस्को, रॅगिंग प्रतिबंधक कायदा, माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील महत्वाच्या तरतुदींची माहिती ही देण्यात आली. विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदे विषयक जनजागृतीबरोबरच कायदेविषयक सहाय्य केले जाते. त्याबरोबर अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितेला मनोधैर्य योजनेतून अर्थसहाय्य केले जाते. याबाबत ही माहिती देण्यात आली.
प्राचार्य डॉ. खर्डे यांनी प्रस्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रा. अक्षय देखणे यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश अन्हाड यांनी आभार मानले.
विधी सहाय्य कक्षाचा शुभारंभ
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आता महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थीनींना त्यांच्या कायदेविषयक समस्यांच्या सोडवणुकीसाठी विधी सेवा प्राधिकरणाची मदत मिळावी, यासाठी महाविद्यालयात कक्ष स्थापन करण्यास सुरूवात करण्यात आली. विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचा टोल फ्री क्रमांक,पत्ता आदी महत्वाची माहिती असलेल्या फलकाचे अनावरण ही करण्यात आले. विद्यार्थी आणि विद्यार्थीनी प्रतिनिधींची या कक्षासाठी समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आली.