नगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील पत्रकारांनी राज्याच्या राजकारण व समाजकारणाला दिशा देण्याचे काम केले आहे. जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा असून, आजही सर्वसामान्य जनतेचा वृत्तपत्रांवर विश्वास कायम आहे. बदलत्या प्रवाहात सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या पत्रकार व वृत्तपत्रांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व वृत्तछायाचित्रकार यांचा सन्मान करण्यात आला. केडगाव, नगर-पुणे महामार्गा लगत कांबळे मळा येथील हॉटेल निसर्ग येथे झालेल्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष साठे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, भिंगार शहर अध्यक्ष राजीव भिंगारदिवे, उपाध्यक्ष गणेश राऊत, युवा नेते ॲड. योगेश गुंजाळ, ज्येष्ठ नेते दिलीप साळवे, उदय अनभुले, सुभाष सोनवणे, प्रणय तपासे, मुन्ना शेख, गाडगे पाटील, आबिद शेख, तेजेंदर ठाकुराठी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे साठे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी पक्ष हा फुले शाहू आंबेडकर विचारांवर तसेच संविधानावर विश्र्वास ठेऊन चालणारा पक्ष आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे विचार हे सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवून संघटना मजबूत करणार तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम सातत्याने करत आहे. जनतेच्या प्रश्नांना पत्रकारांनी नेहमीच प्राधान्य देऊन ते प्रकाशित केले आहे. पत्रकारांच्या प्रश्नासाठी देखील पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.