अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्नेहालय संस्थेतर्फे २०२५ पासून कुठल्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या भारतातील महिलेला ‘स्नेहालय अग्निशिखा’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या वर्षीचा पुरस्कार कोल्हापूर येथील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या साहित्यिक सोनाली नवांगुळ यांना प्रदान करण्यात आला.स्नेहालय संस्था समस्याग्रस्त आणि अत्याचारीत महिलांसाठी स्नेहाधार आणि बालभवन प्रकल्पाच्या माध्यमातून अहोरात्र कार्यरत आहे.महिलांसाठी कायदेशीर मदत,समुपदेशन,रोजगार,आधार घर अशा सेवा पुरविण्याचे आणि पुन्हा नव्या उभारीने जगण्याची आशा निर्माण करण्याचे कार्य इथे होते. नगरच्या २० किलोमीटर क्षेत्रातील १० गावांमध्ये स्नेहाधार तर्फे आधार गट स्थापन करण्यत आले आहेत.गावपातळीवरील अत्याचारित महिलांना तत्काळ मदत करणे तसेच महिलांसाठी असणारे कायदे-हक्क-उपलब्ध सुविधा याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे या आधार गटांचे कार्य आहे.या सर्वांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला.
महिलांना पोलीस खाते हे करियरसाठी महत्वाचे क्षेत्र- सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव
महिला दिनाच्या पहिल्या सत्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव यांना त्यांच्या भरोसा सेल मधील कार्यासाठी तसेच जनमानसात पोलिसांच्या कार्याबद्दल निर्माण केलेल्या जागरूकते बद्दल गौरविण्यात आले. स्नेहालयाच्या सचिव,डॉ. प्रीती भोंबे यांनी पूनम यांच्या मुलाखतीमधून त्यांचा जीवनप्रवास सर्वांच्या पुढे मांडला.आपला पोलीस अधिकारी होण्याचा आव्हानात्मक प्रवास, महिलांना भरोसा सेल द्वारे केलेली मदत,हे सर्व त्यांनी उलगडून सांगितले. प्रत्येक शासकीय विभागात ३० टक्के जागा महिलांना राखीव आहेत. पोलीस खात्यात हा टप्पा गाठायचा असेल तर जास्तीजास्त महिला-मुलीनी पोलीस खात्यात आपले करियर करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.पहिल्या सत्राचे सूत्र संचालन स्वाती रानडे यांनी केले.ॲड.श्याम असावा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रवीण मुत्याल यांनी आभार मानले.
एक सामान्य नागरिक म्हणून मला दिव्यांग असून देखील जगता येणे,ही माझ्या दृष्टीनी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे-सोनाली नवांगुळ
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध अनुवादक व लेखिका सोनाली नवांगुळ यांना वर्ष २०२५ चा पहिला स्नेहालय अग्निशिखा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांचा जीवन प्रवास विश्वस्त मानसी चंदगडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून उलगडला. अपंग असूनही जीवन सहज आणि सकारत्मक कसे जगावे याचा कानमंत्रच त्यांनी या वेळी दिला. अपंगत्व आणि लैंगिकता, समाजाचा दिव्यांग व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन, दिल्या जाणाऱ्या अल्प प्रमाणातील संधी अश्या अनेक विषयांवर त्यांनी विस्तृत भाष्य केले. दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती पेक्षा संधी देण्याची गरज आहे. त्यांना कुठले काम उत्तम करता येऊ शकेल हे शोधून ती संधी दिल्यास त्याचे ते नक्की सोने करू शकतात हे त्यांनी अधोरेखित केले.दुसऱ्या सत्राचे प्रास्ताविक विश्वस्त मुग्धा शुक्रे यांनी केले तर आभार विश्वस्त वैशाली चोपडा यांनी मानले.
‘फिरुनी नवी जन्मेन मी’- स्त्रीच्या जीवनाचा सांगीतिक अविष्कार
कार्यक्रमाची सांगता आशीर्वाद संगीतायान यांनी सदर केलेल्या ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ या स्त्रीच्या आयुष्यातील टप्पे उलगडून दाखविणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमाने झाली. आनंद कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. डॉ. रूपाली कुलकर्णी, सौ. अमृता देशपांडे, सौ. केतकी तांबोळी, इरा कुलकर्णी आणि डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी गीते सादर केली. कार्यक्रमाला साथसंगत तबला आणि ढोलक श्री. अजीत गुंदेचा, सिंथेसायझर श्री. सत्यजित सराफ , ऑक्टोपॅड श्री. श्रीकांत गडकरी आणि संवादिनी श्री. केदार तांबोळी यांनी दिली. सर्व कलाकारांचे आभार रमा गुजर यांनी मानले.याच कार्यक्रमात नुकतेच आफ्रिकेतील किलीमांजारो हे अतिशय अवघड शिखर वयाच्या ५७ व्या वर्षी २६ जानेवारी २०२५ रोजी सर करणाऱ्या, तरुण आणि तडफदार शेवगाव येथील वैद्यकीय व्यावसाईक डॉ मनीषा लढ्ढा यांचा देखील सत्कार विश्वस्त रुपाली मुनोत आणि अनघा बंदिष्टी यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहालय विश्वस्त मंडळ,सर्व संचालक,प्रकल्प व्यवस्थापक व स्नेहालय प्रकल्पातील कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
संगीता सानप,स्नेहालय,मो.९०११०२०१७८