कृषी दिनानिमित्त वांजोळी येथील शेतकऱ्यांना बांधावर सघन कापूस लागवड व संत्रा बाग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
नेवासा (प्रतिनिधी):-कृषी दिनाचे औचित्य साधून दि.१ जुलै २०२६ रोजी मौजे वांजोळी (ता.नेवासा) येथे शेतकरी बांधावर एका विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.सुधाकर बोराळे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन,केंद्र पुरस्कृत उत्पादकता अभियान (कापूस कांती) २०२६-२७ अंतर्गत ‘सघन कापूस लागवड पद्धतीचे’ (High-Density Planting System) थेट प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधताना श्री. सुधाकर बोराळे यांनी सघन कापूस लागवड पद्धतीचे महत्त्व पटवून दिले.ते म्हणाले,
”पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन जर सघन पद्धतीने कापसाची लागवड केली,तर योग्य लागवड अंतरामुळे एकाच क्षेत्रात झाडांची संख्या वाढून उत्पादनात मोठी वाढ होते.यामुळे पाणी आणि खतांचा कार्यक्षम वापर करणे शक्य होते,तण नियंत्रणात येते आणि पर्यायाने उत्पादनाच्या खर्चात मोठी बचत होते.
या मार्गदर्शन दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले आणि सघन लागवडीचे आर्थिक फायदे पटवून देण्यात आले.
कापूस लागवडीच्या प्रात्यक्षिकानंतर कृषी अधिकाऱ्यांनी परिसरातील संत्रा बागेची सविस्तर पाहणी केली.सद्यस्थितीत महत्त्वाच्या असलेल्या आंबे बहार व्यवस्थापनाबाबत आणि संत्रा पिकात तातडीने करावयाच्या आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली.विशेषतःबदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’ परिस्थितीचा फळबागांवर काय संभाव्य परिणाम होऊ शकतो,आणि या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी आत्तापासूनच कोणते जल व अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, याविषयी कृषी तज्ज्ञांनी सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले.
कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या महत्त्वपूर्ण शेतकरी मेळाव्याला व बांधावरील उपक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री.धनंजय हिरवे,मंडळ कृषी अधिकारी श्री.बबनराव कराड,सहायक कृषी अधिकारी श्री.गणेश भराट,आणि सहायक कृषी अधिकारी श्री.रुपेश पवार प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच ‘सिद्धेश्वर शेतकरी गटा’तील सर्व सन्माननीय सदस्य आणि वांजोळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी दिनानिमित्त थेट बांधावर मिळालेल्या या तांत्रिक मार्गदर्शनाबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे मनापासून आभार मानले.
