आलिशान कारमधून ‘त्या’ जीवघेण्या गोष्टीची गुपचूप वाहतूक एलसीबीने मध्यरात्री डाव उलटवला तब्बल २८ लाखांच्या मुद्देमालासह तिघे गजाआड!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीगोंदा तालुक्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे.एका आलिशान कारमधून छुप्या पद्धतीने चालणारी कोट्यवधींची काळी कमाई स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने उधळून लावली आहे.आरोग्याला घातक असणाऱ्या प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २८ लाख ८८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते.२९ जून २०२६ रोजी पथकाला गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली की,मुंढेकरवाडी (ता.श्रीगोंदा) येथे अमोल जाधव नावाचा इसम शरीरास अपायकारक असणारा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणून तो विकण्याच्या तयारीत आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न गमावता मुंढेकरवाडी येथे अमोल जाधव याच्या घराच्या जवळ सापळा रचला. तिथे पोहोचताच पोलिसांना एक पांढऱ्या रंगाची आलिशान कार (अल्कायझर) आणि एक स्विफ्ट कार दिसली.काही इसम त्या कारमधून गोण्यांची अदलाबदल करत होते.संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने छापा टाकला आणि घटनास्थळावरून अमोल रामदास जाधव (वय ३५,रा. मुंढेकरवाडी,श्रीगोंदा),अनिल रतन कुरुमकर (वय ४३, रा. मुंढेकरवाडी,श्रीगोंदा),फरहान रेहमान बेपारी (वय २३, रा. बुरुडगल्ली,श्रीगोंदा) या तीन आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले.
पोलिसांनी जेव्हा पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी केली,तेव्हा या काळ्या धंद्याचे मोठे रॅकेट समोर आले. अमोल जाधवने कबुली दिली की,तो आणि दीपक लोखंडे (रा.लोखंडेवाडी,फरार) हे भागीदारीत हा व्यवसाय चालवतात.हा माल त्यांनी जत (जि.सांगली) येथील अप्पू आणि माजीद (दोघेही फरार) यांच्याकडून खरेदी केला होता. तसेच फरहान बेपारी हा शोयेब राजू तांबोळी (रा.बुरुडगल्ली, फरार) याच्या सांगण्यावरून माल विक्रीसाठी नेत होता. पोलीस आता या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मनोज मोहन साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६४९/२०२६ नुसार नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) चे कलम १२३, २२३, २७४, २७५,३(५) सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ च्या कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.संतोष मुटकुळे,पोउपनि.अनंत सालगुडे,अंमलदार अतुल लोटके,गणेश धोत्रे,शाहिद शेख,मनोज साखरे,प्रशांत राठोड आणि चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.
