काळजाचा थरकाप..काकडवाडीत मोटरसायकलस्वारावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला तरुण बालंबाल बचावला..!वनविभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची आक्रमक मागणी..!
संगमनेर (प्रतिनिधी,दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील काकडवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. नेहमी शांत असलेल्या या परिसरात बिबट्याने थेट एका मोटरसायकलस्वार तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला आहे.या भीषण हल्ल्यात अर्जुनराव शिरसाठ हे युवक गंभीर जखमी झाले असून, सुदैवाने ते या मृत्यूच्या जबड्यातून बालंबाल बचावले आहेत.या घटनेने संपूर्ण तालुक्यात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,काकडवाडी येथील शांताराम मुळे यांच्या घरानजीक असलेल्या मुळे वस्तीवर ही घटना घडली. गावाच्या दरम्यान असलेल्या शेतामध्ये वाढलेल्या गिन्नी गवताचा आडोसा घेऊन एक हिंस्र बिबट्या दबा धरून बसला होता.दुपारच्या सुमारास अर्जुनराव शिरसाठ हे आपल्या मोटरसायकलवरून या मार्गावरून जात होते.ते शेताच्या जवळून जात असतानाच,बेसावध क्षणाचा फायदा घेऊन बिबट्याने थेट त्यांच्यावर झेप घेतली.
बिबट्याने अचानक केलेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे अर्जुनराव काही वेळ गोंधळले, मात्र त्यांनी हिंमत न हारता प्रतिकार केला.बिबट्याच्या नखांमुळे आणि दातांमुळे त्यांच्या हातावर व पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत.आरडाओरडा झाल्याने बिबट्याने तिथून धूम ठोकली.हल्ल्यानंतर रक्ताळलेल्या अवस्थेत अर्जुनराव यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने घुलेवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून ती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र,या हल्ल्याच्या धक्क्यातून ते अजूनही सावरलेले नाहीत.
काकडवाडी परिसरात यापूर्वी बिबट्याने पाळीव शेळ्या,गाई आणि इतर लहान प्राण्यांवर अनेकदा हल्ले केले होते.मात्र, माणसावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे.यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे. संगमनेर वनविभागाने घटनास्थळी तात्काळ पिंजरा लावून या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे,अशी आक्रमक मागणी काकडवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे.तसेच, जखमी अर्जुनराव शिरसाठ यांना वनविभागाकडून उपचाराचा संपूर्ण खर्च व तातडीची मदत मिळावी, अशीही मागणी होत आहे.
या गंभीर घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष तथा पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.त्यांनी आवाहन केले आहे की,परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून तो आता हिंस्र झाला आहे. नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी शेतात चारा कापणी करताना किंवा प्रवास करताना पूर्णपणे सावध राहावे.”
”विशेषतः रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे. हातात काठी, बॅटरी किंवा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावूनच बाहेर पडावे. बेसावध न राहता स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी.
