अतूट नात्याची साक्ष! चिंचोली गुरवमध्ये वटपौर्णिमा उत्साहात साजरी; सुवासिनींनी घातले सौभाग्याचे साकडे
चिंचोली गुरव (संगमनेर तालुका प्रतिनिधी राजेंद्र मेढे):-सात जन्मी हाच पती मिळावा आणि पतीला उदंड आयुष्य लाभावे,” या पवित्र भावनेने आज संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून, चिंचोली गुरव येथील सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीभावाने वडाच्या झाडाचे पूजन केले.पारंपरिक वेशभूषेत महिलांचा उत्साह ओसंडून वाहिला
आज सकाळपासूनच चिंचोली गुरव गावामध्ये महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह ओसंडून वहात होता.पारंपरिक वेशभूषा, अंगावर दागदागिने आणि हातात पूजेचे ताट घेऊन सुवासिनींनी गावातील वडाच्या झाडापाशी गर्दी केली होती. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सुवासिनींनी आज कडक उपवास पाळला होता.
सुती धागा गुंडाळत मारले सात फेरे!
‘सात जन्मी हाच पती मिळावा’ अशी मनोभावे प्रार्थना करत महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली. वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळत, सात फेरे मारून महिलांनी आपल्या सौभाग्याचे साकडे घातले. यावेळी चिंचोली गुरव येथील वातावरण अगदी भक्तीमय झाले होते. पूजेनंतर एकमेकींना हळदी-कुंकू लावून आणि वाण देऊन महिलांनी वटसावित्री उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
भारतीय संस्कृतीतील पती-पत्नीच्या अतूट नात्याची साक्ष देणारा हा सण चिंचोली गुरवमध्ये अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात पार पडला.
