‘डायल ११२’ खणखणला अन्…तोफखाना पोलिसांनी उधळला घातपाताचा थरारक डाव.. तलवारीसह आरोपी जेरबंद!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सशस्त्र गुंड परिसरात उच्छाद मांडणार,जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी घातपात घडवणार…असाच काहीसा थरारक बेत एका इसमाने आखला होता.मात्र,जागरूक नागरिकाने दाखवलेले समयसुचकता आणि ‘डायल ११२’ हेल्पलाइनचा प्रभावी वापर यामुळे तोफखाना पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेत एका संशयित गुंडाला धारदार तलवारीसह रंगेहात अटक केली आहे.या धडक कारवाईमुळे तोफखाना परिसरात मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.दि. २९/०६/२०२६ रोजी तोफखाना पोलीस ठाण्याचे अंमलदार गोरख धाकतोडे हे ‘डायल ११२’ च्या ड्युटीवर तैनात होते.याच दरम्यान त्यांना कंट्रोल रूमकडून एक थरारक कॉल आला.बोल्हेगाव येथील रेणुकानगर परिसरात एक इसम जुन्या भांडणाच्या कारणावरून कोणाचा तरी घातपात करण्याच्या उद्देशाने उघडी तलवार घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अंमलदार गोरख धाकतोडे यांनी तात्काळ ही बाब तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या कानावर घातली.पोलीस निरीक्षकांनी क्षणाचाही विलंब न लावता गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना तातडीने पथकासह रवाना होण्याचे आदेश दिले.
गुन्हे शोध पथकाने तात्काळ रेणुकानगर (बोल्हेगाव) गाठले.तिथे डायल ११२ वर मिळालेल्या वर्णनाचा इसम संशयास्पदरीत्या कमरेला काहीतरी टोकदार वस्तू लावून फिरताना दिसला.पोलिसांनी मोठ्या चाणाक्षपणे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी पकडलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव शैलेश इग्नती पाळंदे (वय ४५ वर्षे,रा. रेणुकानगर,बोल्हेगाव,ता.जि. अहिल्यानगर) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जातून तब्बल ३५ इंच लांबीची आणि अंदाजे १०००/- रुपये किमतीची टोकदार,धारदार लोखंडी तलवार मिळून आली.पोलिसांनी ती तलवार जागीच जप्त केली असून, आरोपी विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५२५/२०२६, आर्म ॲक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल घोरपडे करत आहेत.सदरची कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे (नगर शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.बालाजी वैद्य, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार आणि डायल ११२ चे पोलीस कर्मचारी गोरख धाकतोडे यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली.
