बळीराजाच्या जीवाशी खेळ! ‘या’ प्रसिद्ध खत दुकानाचा काळा धंदा उघड तब्बल २१ लाखांचा साठा जप्त मालकावर गुन्हा दाखल..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून एक धक्कादायक आणि शेतकऱ्यांचे डोळे पांढरे करणारी बातमी समोर आली आहे.आधीच दुष्काळ आणि संकटांशी सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीत आणखी एक खंजीर खुपसण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निकृष्ट आणि बोगस दर्जाच्या खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मे.कृषी गौरव फर्टिलायझर्स (घोडेगाव,ता.नेवासा) या मोठ्या आस्थापनेवर कृषी विभागाने सर्जिकल स्ट्राईक केला आहे.या धडक कारवाईत तब्बल २१ लाख ८० हजार ४८६ रुपये किमतीचा २ हजार ३४ गोण्यांचा बेकायदेशीर आणि विषारी स्वरूपाचा खतसाठा जप्त करण्यात आला आहे.कृषी विभागाने या दुकानाचा खत विक्री परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला असून,मालक किरण चंद्रकांत दौंडकर याच्या विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गंभीर गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यात बोगस खत विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हापरिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या विशेष पथकाने १५ जून २०२६ रोजी एमआयडीसी, शिंगवे तुकाई येथील ‘प्लॉट क्र. बी-५६’ वर असलेल्या मे. कृषी गौरव फर्टिलायझर्सच्या गोदामावर अचानक धाड टाकली. या तपासणी दरम्यान अधिकारीही चक्रावून गेले.खत विक्री आणिसाठवणुकी संदर्भातील कोणतीही कायदेशीर कागदपत्रे,पावत्या किंवा साठा नोंदवह्या (Stock Registers) तिथे उपलब्ध नव्हत्या.नामांकित कंपन्यांच्या गोण्यांचा वापर करून आतमध्ये बेकायदेशीररीत्या तयार केलेले बनावट रासायनिक खत भरले जात असल्याचे निदर्शनास आले. पथकाने तात्काळ २ हजार ३४ गोण्या सील केल्या.
सामान्यत: खतांचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेला ३० दिवसांचा वेळ लागतो. मात्र, शेतकऱ्यांच्या पिकांशी आणि जमिनीच्या आरोग्याशी जोडलेला हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने, कृषी विभागाने अवघ्या १० दिवसांत पुणे येथील खत नियंत्रण प्रयोगशाळेकडून अहवाल मागवून घेतला.
या शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालात अत्यंत धक्कादायक सत्य समोर आले आहे. जप्त केलेल्या खतांचे नमुने पीएच (pH), सेंद्रिय कर्ब आणि कार्बन-नायट्रोजन (C/N Ratio) या शासकीय मानकांमध्ये पूर्णपणे नापास झाले आहेत. हे खत पिकांसाठी अत्यंत घातक आणि पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.“शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या आणि बोगस खते विकणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कृषी विभागाने आता युद्ध पुकारले आहे. यापुढेही अशी कठोर कारवाई सुरूच राहील. कोणत्याही बड्या नेत्याचा किंवा व्यक्तीचा दबाव खपवून घेतला जाणार नाही आणि कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” असा कडक इशारा कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिला आहे.
