घरकुलाच्या पैशांवर डल्ला..गरीब लाभार्थ्याला लुटणारे ‘ते’ तीन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात ‘या’ ग्रामपंचायतीत एकच खळबळ..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या एका गरिबाच्या हप्त्यांवर डोळा ठेवून तब्बल २० हजार रुपयांची लाच उकळणाऱ्या राहुरी तालुक्यातील तीन बड्या लोकसेवकांचा बुरखा अखेर टरकला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रचलेल्या धडक सापळ्यात सात्रळ ग्रामपंचायतीचा ग्रामविकास अधिकारी,कंत्राटी लिपिक आणि पंचायत समितीचा गृहनिर्माण अभियंता रंगेहात अडकले आहेत.या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.सात्रळ (ता. राहुरी) येथील एका गरजू तक्रारदाराने ‘प्रधानमंत्री आवास योजने’ अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता. सन २०२३ मध्ये त्यांचे घरकुल मंजूरही झाले.गरिबाचे हक्काचे घर उभे राहावे म्हणून शासनाकडून बांधकामासाठी पहिला हप्ता १५ हजार रुपये आणि दुसरा हप्ता ७० हजार रुपये तक्रारदाराला मिळाला होता.घराचे काम पुढे सुरू होते,मात्र पुढील अनुदानाचा हप्ता बँकेत जमा करण्यासाठी या त्रिकुटाने तक्रारदाराची अडवणूक सुरू केली.पुढील हप्ता मंजूर करण्याच्या बदल्यात २० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.लाचखोरांच्या जाचाला कंटाळून तक्रारदाराने २९ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्याकडे थेट तक्रार नोंदवली.एसीबीच्या पथकाने तात्काळ हालचाली करत ३० जून रोजी तक्रारीची पडताळणी केली.तपासात कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे याने ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल व अभियंता सचिन ब्राम्हणे यांच्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर,एसीबीच्या पथकाने राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला.ठरल्याप्रमाणे लिपिक डुकरे याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली,तर अभियंता ब्राम्हणे याने ती रक्कम स्वीकारण्यास त्याला प्रोत्साहन दिले.लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही जागेवरच ताब्यात घेतले.ही धडक कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे,अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता तांबे यांनी पार पाडली.तर पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी या कारवाईचे पर्यवेक्षण केले.पथकात पोलीस निरीक्षक राजू आल्हाट,पोलीस कर्मचारी चंद्रकांत भीमसेन,किशोर कुळधरण,शेखर वाघ आणि चालक दशरथ लाड यांचा समावेश होता.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करत आहेत.
