भरचौकात गोळीबार करून पळणारे ‘ते’ दोघे २४ तासांत जेरबंद..नगर एलसीबी पोलिसांची नाशिक रोडवर कारवाई!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जुन्या वादाच्या रागातून भरदुपारी गोळीबार करून एका तरुणाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.अभय उर्फ अभी सुरेश ससाणे आणि अक्षय किरण कपोते अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून,ते नाशिक येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले.
घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की,दि.०२ जुलै २०२६ रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मित्र शुभम यादव हे श्रीरामपूर येथील वॉर्ड नं.०७ मधील म्हसोबा चौक,पूर्णवादनगर येथे बोलत उभे होते.या वेळी जुन्या वादाची खुन्नस मनात ठेवून मुख्य आरोपी अभय सुरेश ससाणे याने आपल्या इतर पाच साथीदारांसह तिथे येऊन फिर्यादी व जखमी शुभम यादव यांना लाकडी दांडके व इतर हत्यारांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.हा राडा एवढ्यावरच थांबला नाही,तर अभय ससाणे याने आपल्या जवळील बंदूक काढून शुभम यादव याच्यावर थेट गोळी झाडली.या गोळीबारामुळे शुभम यादव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे श्रीरामपूर परिसरासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.यादरम्यान, दि.०३ जुलै २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली की,मुख्य आरोपी अभय ससाणे हा त्याच्या साथीदारासह नाशिकच्या देशाने पळून जात आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी नाशिकच्या दिशेने झेप घेतली आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता,त्यांनी जुन्या वादातूनच हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीरामपूर पोलिसांकडून अत्यंत वेगाने सुरू असून,त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक मुले शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोउपनि/महादेव गुट्टे,पोलीस अंमलदार शाहीद शेख,रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव,सागर ससाणे आणि रमीजराजा अतार यांच्या विशेष पथकाने केली आहे.
