अहिल्यानगरमध्ये ‘पुष्पा’ स्टाईल चंदन तस्करी! स्विफ्ट कारमधून चालला होता ‘येथे’ मोठा ‘खेळ’; थेट ‘मध्यप्रदेश कनेक्शन’ उघड झाल्याने खळबळ, एलसीबीची धडक कारवाई!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून,स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चंदन तस्करांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिल्मी स्टाईलने टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल १ लाख ४५ हजार ६४५ रुपये किमतीच्या चंदनासह दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.या कारवाईमुळे जिल्ह्यातील आणि परराज्यातील चंदन तस्करांचे धाबे दणाणले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध चंदन वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एक विशेष पथक तयार करून रवाना केले होते.१६ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोनई परिसरात गस्त घालत असताना,त्यांना एक अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त माहिती मिळाली.सोनई येथील ‘आकाश हॉटेल’च्या पाठीमागे एक इसम बंदी असलेले चंदनाचे झाड चोरून, ते विकण्याच्या उद्देशाने लपवून बसला आहे.माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या पथकाने तात्काळ नियोजन करून हॉटेलच्या पाठीमागे छापा टाकला.
तिथे पोलिसांनी संशयास्पदरित्या रंगेहात पकडलेल्या इसमाची चौकशी केली असता,त्याने आपले नाव बाळासाहेब हरीभाऊ गायकवाड (वय ५२, रा.चांदा,ता.नेवासा) असल्याचे सांगितले.पोलिसांनी जेव्हा बाळासाहेब गायकवाड याची कसून चौकशी केली,तेव्हा चंदन तस्करीचे आंतरराज्यीय कनेक्शन समोर आले. आरोपीने कबुली दिली की,तो आणि त्याचा कार चालक शरद दत्तात्रय म्हेत्रे (रा.चांदा,ता. नेवासा) हे दोघे मिळून स्विफ्ट कारमधून या चंदनाची वाहतूक करत होते.हे चंदन ते मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील रियाज भाई नावाच्या मुख्य खरेदीदाराला विकणार होते. पोलिसांच्या पथकाने तत्परता दाखवत कार चालक शरद म्हेत्रे यालाही ताब्यात घेतले आहे.आरोपींच्या घराची आणि जागेची झडती घेतली असता, पोलिसांना १ लाख ४५ हजार ६४५ रुपये किमतीचे एकूण ४८ किलो ४९५ ग्रॅम चंदनाची लाकडे आढळून आली.पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
या गुन्ह्यात आणखी चार आरोपींचा सहभाग असून ते फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार बाळासाहेब अशोक गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३२२/२०२६ नुसार,भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) तसेच भारतीय वन कायदा १९२७ चे कलम ४२ आणि महाराष्ट्र वन अधिनियम कलम ३३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या आंतरराज्यीय टोळीचा पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.संतोष मुटकुळे, पोउपनि.अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, फुरकान शेख,बाळासाहेब नागरगोजे,रोहीत येमुल, बाळासाहेब गुंजाळ,प्रशांत राठोड,चालक चंद्रकांत कुसळकर आणि महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली.
