एका निर्णयाने बदललं सलगरा जिल्हापरिषद शाळेचं रुपड..सरपंच सुनिताताई चव्हाण अन् उपसरपंचांचा मोठा धमाका! शाळेस १५ व्या वित्त आयोगातून शैक्षणिक व क्रीडा साहित्याची मोठी भेट
तुळजापूर (विशेष प्रतिनिधी):-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण अधिक दर्जेदार व हायटेक व्हावे,यासाठी तुळजापूर तालुक्यातील सलगरा (म) ग्रामपंचायतीने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगरा (म) या शाळेला आधुनिक शैक्षणिक,डिजिटल आणि क्रीडा साहित्याची भव्य भेट देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे पंचक्रोशीत शाळेचे आणि गावाचे कौतुक होत आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेला प्रिंटर आणि नवीन बोर्ड (फळे) देण्यात आले आहेत.तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी पाण्याची टाकी आणि सुसज्ज वॉशबेसिनची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच,विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी खेळाचे भरपूर साहित्य खेळणी म्हणून भेट देण्यात आली आहे.या साहित्यामुळे चिमुरड्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.सुनिता आप्पाराव चव्हाण,उपसरपंच हरीश बेंडकाळे, ‘ज्ञानेश्वर विकास सलगरा (म)’ संस्थेचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी रामचंद्र (दादा) चव्हाण यांच्यासह श्री.माने सर आणि श्री. मोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री.लष्करे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पहार व गुच्छ देऊन सहर्ष स्वागत व सत्कार केला. गावाच्या विकासा सोबतच शाळेच्या प्रगतीसाठी नेहमी पाठीशी राहणाऱ्या ग्रामपंचायतीचे मुख्याध्यापकांनी विशेष आभार मानले.या सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन श्री. सरवदे सर यांनी केले.ग्रामपंचायतीने दाखवलेल्या या दातृत्वामुळे सलगरा (म) शाळेचा दर्जा नक्कीच उंचावेल आणि विद्यार्थी अधिक उत्साहाने शिक्षण घेतील,असा विश्वास शिक्षकांनी व गावकऱ्यांनी व्यक्त केला.या यशस्वी कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साही वातावरणात झाली.
