घरातूनच चालत होतं गांजा विक्रीचे रॅकेट..गांजा तस्कर जेरबंद मात्र मुख्य सूत्रधाराची हुलकावणी
अहिल्यानगर (दि.15 जुलै):-जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता थेट ‘सर्जिटल स्ट्राईक’ सुरू केला आहे. श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक २ मधील कुरेशी मोहल्ला परिसरात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि श्रीरामपूर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या एका तस्कराला मुद्देमालासह रंगेहात अटक केली आहे.या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सचे पथक श्रीरामपूर शहरात गस्त घालत होते.या दरम्यान,पथकाला गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली की,कुरेशी मोहल्ला,वार्ड नं.२ येथील उर्दू शाळा नंबर ४ आणि ५ च्या शेजारी राहणारा इरफान छोटू शेख (वय ४०) हा त्याच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीसाठी आणून लपवून बसला आहे.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्याशी संपर्क साधला.त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीरामपूर शहर सपोनि.राम शिखरे,महिला पोलीस अंमलदार मिरा सरग यांच्या संयुक्त पथकाने सरकारी वाहनाने थेट कुरेशी मोहल्ल्यातील इरफान शेख याच्या घरावर छापा टाकला.पोलिसांना घरात पाहताच आरोपीची पळापळ झाली, मात्र सतर्क पोलिसांनी त्याला जागेवरच ताब्यात घेतले. घराची आणि आरोपीची झडती घेतली असता, पोलिसांना एका प्लास्टिकच्या पिशवीत तीव्र उग्र वास येणारा पदार्थ आढळला.कसून चौकशी केली असता आरोपीने तो अंमली पदार्थ ‘गांजा’ असल्याचे कबूल केले.पोलिसांनी आरोपी इरफान शेख याच्याकडून
६०४.८४ ग्रॅम गांजा (किंमत रु. १५,१२१/-),रोख रक्कम (रु. २,०००/-)इलेक्ट्रॉनिक वजन काटा (किंमत रु. ५००/-) एकूण:१७,६२१/ रू. किमतीचा किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांनी जेव्हा या गांजाच्या स्त्रोताबद्दल चौकशी केली,तेव्हा या गुन्ह्यातील आणखी एक धक्कादायक नाव समोर आले.बजरंग चौक (वार्ड नं.२,श्रीरामपूर) येथील ‘फकीर’ (पूर्ण नाव माहिती नाही) नावाच्या इसमाने हा गांजा पुरवला होता.
सध्या हा मुख्य पुरवठादार फकीर फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६९४/२०२६ नुसार,अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act 1985) च्या कलम ८ (क), २०(ब) ii (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.संतोष मुटकुळे, पो.नि.विशाल खैरे,पोउपनि अनंत सालगुडे,रिचर्ड गायकवाड,शामसुंदर जाधव, भगवान थोरात,रमीजराजा आतार,विशाल तनपुरे आणि चालक भगवान धुळे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
