अहमदनगर (दि.१३ सप्टेंबर):-चोरी केलेली मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना कोतवाली पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले आहे. केडगाव बायपास चौकातून (ता.१२) दुपारी दीड वाजताचे सुमारास दोन जणांना विना क्रमांकाच्या मोटरसायकलसह कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजाजन हिलालसिंग मोरे (वय-२० वर्षे, रा. गणपती कॉम्पलेक्स मागे रांजणगांव जि पुणे मुळ रा. पिंपळकुटा महादेव ता मलकापुर जि बुलडाणा), देवेंद्र विजेंद्र सपकाळे (वय २१ वर्ष रा गणपती कॉम्पलेक्स मागे रांजणगाव जि पुणे मुळ रा. कोरेपानाचे ता भुसावळ जि जळगाव) अशी ताब्यात घेतलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, विनाक्रमांकाची चोरीतील मोटरसायकल दोन इसम केडगाव बायपास परिसरात विक्री करण्यासाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांच्या पथकाने लगेच केडगाव बायपास चौकात सापळा लावून संशयीत दोघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता आरोपींनी चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलो असल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत ३० हजार रुपये किमतीची पॅशन प्रो मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुल कादर इनामदार, सलीम शेख, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, अतुल काजळे, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
