
अहमदनगर (दि.११ नोव्हेंबर):-कापूस चोरीसाठी आलेल्या चोरट्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याने या घटनेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवारात घडली आहे.

कडगाव शिवारातील मोहजबुद्रुक मिरी रस्त्यावर कारभारी रामदास शिरसाट यांची वस्ती असून शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या वस्तीवर आज्ञात चोरटे त्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला कापूस चोरून नेण्यासाठी आले.

त्यानंतर शेडमधील दहा-बारा कापसाच्या गोण्या या चोरट्यांनी उचलून नेत जवळच्या उसात नेऊन ठेवल्या.कापूस चोरून नेत असताना शिरसाट यांना जाग आली आणि त्यानंतर या चोरट्यानी त्यांच्यावर हल्ला केल्याने या घटनेमध्ये कारभारी शिरसाठ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ही घटना दुसऱ्या दिवशी शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली त्यानंतर काही वेळातच या ठिकाणी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,डीवायएसपी सुनील पाटील,अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी देखील तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन आरोपींचा कसून शोध घेण्याच्या दृष्टीने तपास यंत्रणा गतिमान केली आहे. श्वानपथक, ठसेतज्ञ यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून तपास यंत्रणेला मदत केली आहे. कारभारी शिरसाट अतिशय कष्टाळू आणि गरीब शेतकरी होते.
त्यांचा एक मुलगा सैन्य दलात आहे तर दुसरा इंजिनियर आहे वडिलांच्या मृत्यूची माहिती समजताच इंजिनीयर मुलगा नगरहून कडगाव येथे आल्यानंतर कारभारी शिरसाट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.एैन दिवाळीच्या तोंडावर शिरसाठ यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कडगावसह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.