
अहमदनगर (दि.५ डिसेंबर):-अहमदनगर शहरामध्ये चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीस अंबिवली,कल्याण येथुन जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

बातमीची हकिगत अशी की,दि.01 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी शारदा रघुनाथ गाजुल (वय 67 वर्षे,रा.जाधव मळा,बालीकाश्रम रोड, अहमदनगर) या बालीकाश्रम रोडने त्यांचे घरी जात असतांना समोरुन मोटारसायकलवर दोन इसमांनी येवुन फिर्यादीचे गळ्यातील 1,05,000/- रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे गंठण व एक तोळे वजनाची सोन्याची चैन तोडुन बळजबरीने चोरुन घेवुन पळुन गेले होते.

या घटने बाबत तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.1689/2023 भादविक 392, 34 प्रमाणे अनोळखी दोन आरोपी विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद घटना घडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणणे करीता विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव,पोहेकॉ/सुनिल चव्हाण,संदीप पवार,दत्तात्रय गव्हाणे,पोना/रविंद्र कर्डीले, संतोष लोढे,पोकॉ/अमृत आढाव अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुण नाउघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.स्थागुशा पथक घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपीची माहिती घेत असतांना सी.सी.टी.व्ही. फुटेजमधील संशयीत इसमाचे नांव मुसा अण्णु सय्यद उर्फ इराणी रा.अंबिवली,कल्याण हा असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीचा दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी अंबिवली,कल्याण या ठिकाणी जावुन शोध घेत असतांना आरोपी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे पुर्ण नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव मुसा अण्णु सय्यद उर्फ इराणी वय – 30 वर्षे, रा. अंबिवली, कल्याण, ता. कल्याण, जि. ठाणे असे असल्याचे सांगितले.
सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार अज्जु पुर्ण नांव गांव माहित नाही याचेसोबत त्यांचे कडील बजाज कंपनीचे पल्सर एन. एस. मोटारसायकलवर येवुन गंठण चोरी केल्याचे सांगितले. सदर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदर गुन्ह्यातील बळजबरीने चोरी केलेले सोन्याचे दागिण्याची त्याची आई नामे सिमा अण्णु सय्यद उर्फ इराणी, व बहीण नामे रेश्मा अण्णु इराणी उर्फ सय्यद दोन्ही रा. अंबिवली, कल्याण यांचे मार्फतीने विक्री केले असल्याचे सांगितले.
सदर आरोपीचे कब्जामध्ये गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीतुन आलेले 9,700/- रुपये मिळुन आल्याने ते ताब्यात घेवुन सदर आरोपीस तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे व पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी मुसा अण्णु सय्यद उर्फ इराणी याचे विरुध्द यापुर्वी कल्याण व ठाणे जिल्ह्यामध्ये मोक्का, जबरी चोरी, चैन स्नॅचिंग, सरकारी कामात अडथळा आणणे,चोरी अशा प्रकारचे एकुण 14 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री. अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.