नगर (प्रतिनिधी):-केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर तालुक्यासाठी १७ कोटी व नगर तालुक्यासाठी २३ कोटी तसेच श्रीगोंदा तालुक्यासाठी ६० कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर, श्रीगोंदा आणि नगर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यावेळी खासदार सुजय विखे यांनी स्पष्ट केले की, हे यश माझ्यासह आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आहे. या सर्वांसमवेत केलेल्या पाठपुराव्यामुळे सदरील भरीव निधी मंजूर झाला असल्याचे मत सुजय विखेंनी मांडले.
यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील रस्ते विकासासाठी आमदार बबनराव पाचपुते आणि माझ्या प्रयत्नांतून ६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून काष्टी – खरातवाडी – पेडगावर रस्ता प्रजिमा – ६४ (गौते वस्ती-पेडगाव) आणि चिंबळा – वांगदरी – काष्टी – शिपळकरवाडी कौठा प्रजिमा – ०३ ते अजनुज खरातवाडी रस्ता प्रजिमा – २३७ (वांगदरी-काष्टी) या रस्त्यांचे काम होणार आहे.
तसेच नगर तालुक्यातील रस्ते विकासासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि माझ्या प्रयत्नांतून २३ कोटी रुपये मंजूर झाले असून या निधीपैकी निंबळक – चास – खंडाळा – वाळुंज – नारायणडोह – पिंपळगाव उज्जैनी – पोखर्डी रस्ता प्रजिमा – १ (कापूरवाडी-पोखर्डी) साठी १५ कोटी रुपये तर टाकळी काझी – भातोडी ते बीड रस्ता प्ररामा – १६ (टाकळी काझी -भातोडी -मदडगाव हद्द) करिता ०८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्यांच्या कामांना देखील झळाळी मिळाली आहे.
यासोबतच पारनेर तालुक्यातील रस्ते विकासासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माझ्या प्रयत्नांतून १७ कोटी रुपये मंजूर झाले असून या निधीतून रामा ६९ ते वडनेर हवेली – राळेगण सिद्धी रोड प्रजिमा – २१८ रस्ता (वडनेर हवेली ते गटेवाडी) करिता १० कोटी रुपये तर राहाता – लोहारे – मांडवे – पारनेर – श्रीगोंदा रस्ता रामा – ६७ (कुंभारवाडी -सोबळेवाडी, पारनेर, पानोली -राळेगण सिद्धी) साठी ०७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या रस्त्यांचे काम देखील मार्गी लागणार आहे. अशी माहिती यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.या रस्त्यांना गती मिळाल्याने निश्चितच जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून जनतेच्या हितासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अखंड कार्यरत राहू असे मत देखील यावेळी खासदार विखेंनी व्यक्त केले.