राहाता प्रतिनिधी:-राहाता येथील रांजणखोल गावातील जिल्हा परिषद शाळेत निपुण भारत अभियानांतर्गत निपुण माता गटाचा ‘निपुण उत्सव’ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या प्रसंगी माता गटांनी भाषा,गणित व इंग्रजी विषयाच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञावर आधारित साहित्याचे स्टॉल मांडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच मनोरंजनात्मक खेळातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधण्यासाठी विविध भाषिक खेळांचे सादरीकरण केले. या उत्सवामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थाचा स्टॉल विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरला.निपुण माता गटांच्या माता सदस्यांनी आज गटांच्या नावाप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी,राजमाता जिजाबाई,माता रमाबाई आंबेडकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेसह उत्सवात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रांजणखोल गावच्या सरपंच सौ.शुभांगीताई ढोकचौळे यांनी स्वीकारले तर या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायतचे सदस्य , सर्व माता पालक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक देठे सर, गिरमे सर,निळे सर,ठक्कर मॅडम,म्हैत्रे मॅडम,कोष्टी मॅडम,शेख मॅडम,मोकळ मॅडम यांनी मेहनत घेतली.