अहमदनगर (दि.१० ऑगस्ट):-कंपनीतून पाठविलेल्या प्लायवुड आणि पार्टीकल बोर्डच्या मालाचे ७५ लाख ४४ हजार रुपये न देता नगर येथील एका व्यावसायिकाची मुंबईच्या दोघा व्यावसायिकांनी फसवणूक केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.सुरेंद्र मोतिलाल लोढा (रा.माणिकनगर, आनंदऋषी हॉस्पिटलच्या मागे,नगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांनी गुरूवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरिकिसन भट्टड, ब्रिजेश भट्टड (पूर्ण नावे नाही,दोघे रा.१०४ बालाजी भवन,नरिमन पॉईंट,मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.लोढा यांची नगर एमआयडीसीत एस.मोतिलाल इंडस्ट्रीज नावाची कंपनी असून यामध्ये प्लायवूड आणि पार्टीकल बोर्ड तयार केले जातात.
या कंपनीचे सर्व व्यवहार लोढा यांच्या एस.मोतीलाल प्लायवूड हाऊस,टीन गल्ली, गंजबाजार,नगर येथील कार्यालयातून चालतात. या कार्यालयात २ मार्च २०२० रोजी आर.एम. बी.इव्हेंट मॅनेजमेंट प्रा. ली.१०४,भवन,बजाज नरीमन पॉईंट,मुंबई या फर्मचे हरिकीसन भट्टड व ब्रिजेश भट्टड आले होते.त्यांनी लोढा यांच्या कडे प्लायवूड,पार्टीकल बोर्ड,एम.डी.एफ.बोर्डची मागणी केली.त्यांच्या मागणीनुसार लोढा यांनी वेळोवेळी एक कोटी ९३ लाख ३४ हजार ५२५ रुपये,चार कोटी नऊ लाख ३४ हजार ५२५ रुपये किंमतीचा माल दिला होता.
त्याचे पैसेही यांना होते.तसेच त्यानंतर दोन कोटी चार लाख ३४ हजार ५२५ रुपयांचा माल दिला होता.त्याचे एक कोटी ६० लाख रुपये मिळाले होते तर ४४ लाख ३४ हजार ५२५ रुपये बाकी होते.१ एप्रिल २०२२ रोजी हरिकिसन भट्टड व ब्रिजेश भट्टड यांनी लोढा यांच्याकडून ३१ लाख नऊ हजार ४७६ रुपये किंमतीचा माल खरेदी केला होता.यापूर्वी दिलेल्या मालाचे ४४ लाख ३४ हजार ५२५ व नंतर दिलेल्या मालाचे ३१ लाख नऊ हजार ४७६ रुपये असे एकुण ७५ लाख ४४ हजार एक रुपये भट्टड यांच्याकडे बाकी राहिले होते.सदर बाकी राहिलेले पैसे लोढा यांनी मागितले असता आमची कंपनी सध्या अडचणीत आहे.
असे वारंवार सांगून भट्टड यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.आपली फसवणूक झाल्याचे लोढा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज दाखल केला.सदरचा अर्ज चौकशीसाठी कोतवाली पोलिसांकडे आला होता. या अर्जाची चौकशी करून पोलिसांनी गुरूवार,८ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोतवाली महिला सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे करत आहेत.
