राहुरी (प्रतिनिधी):-डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालयातर्फे ब्राम्हणी गावात शेतकरी मेळावा संपन्न झाला. डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालयातर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम सन 2024 – 25 अंतर्गत सदरील मेळाव्याचे आयोजन 6 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे, प्रमुख व्याख्याते म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ कापूस सुधार प्रकल्पाचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भचते तसेच वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ भाऊसाहेब पवार, स्किल इंडिया प्रोजेक्टचे मास्टर ट्रेनर अजय गवळी तसेच ब्राम्हणी गावाचे प्रगतीशील शेतकरी व उद्योजक सुरेश बानकर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून ब्राम्हणी गावाच्या सरपंच सुवर्णाताई बनकर, उपसरपंच गणेश तारडे, ग्रामसेवक श्रीकांत काळे, कृषि सहायक शुभम कदम, तलाठी जालिंदर पाखरे तसेच ग्रा. पं. सदस्य महेंद्र तांबे, पंडित हापसे, अनिल ठुबे, सोसायटीचे माजी चेअरमन प्रभाकर हापसे तसेच कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एस. दांगडे, प्रा. पी. सी. ठोंबरे, प्रा. बी. व्ही. गायकवाड तसेच या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. नंदकुमार भुते यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. निसर्ग किडींचे संवर्धन करणे व जैविक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. कीटकांच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे आणि प्रकाश सापळे यांचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांचा वापर कसा करावा, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क,गांडूळ खताचा अर्क, जिवामृत या सर्वांचा वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळण्याबद्दलचे त्यांनी मार्गदर्शन केले.
स्किल इंडिया प्रोजेक्ट चे ट्रेनर अजय गवळी यांनी जैविक शेतीचे महत्व, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ भाऊसाहेब पवार यांनी कपाशी पिकाचे व्यवस्थापन व उत्पादन तंत्रज्ञान यावर सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच ब्राम्हणी गावाचे प्रगतीशील शेतकरी व उद्योजक सुरेश बानकर यांनी कृषी महाविद्यालयाच्या कृषी दूतांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मधुकर धोंडे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे. रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे. तसेच सेंद्रिय शेतीचे महत्व सांगितले. शेती व्यवसायासोबत शेतीपूरक व्यवसाय देखील करणे गरजेचे असून एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी दूत अरविंद काळे व आभार प्रदर्शन वृषभ गुगळे यांनी केले.
