अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुक्यातील अकोळनेर येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पारायण आणि अखंड हरीनाम सप्ताहात वारकरी बनून आलेल्या जालना जिल्ह्यातील महिला व पुरुषांच्या टोळीने चांगलाच उच्छाद घालत अनेक महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले. मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्यावर तेथे उपस्थित नागरिकांच्या मदतीने १८ जणांच्या टोळीला पोलीस पथकाने पकडले.
अकोळनेर येथे १६ एप्रिल पासून हा सोहळा मोठ्या स्वरुपात सुरु होता. २३ एप्रिल रोजी या सोहळ्याची सांगता होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी जिल्हाभरातील भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला होता. दुपारी १२ च्या सुमारास गाथा पारायणाची सांगता झाली. त्यानंतर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. या गर्दीत अनेक महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांच्या चोऱ्या होऊ लागल्या, काही वेळात चोऱ्यांच्या या घटना निदर्शनास येवू लागल्या. त्यामुळे तेथे उपस्थित स्वयंसेवक सतर्क झाले. त्यांनी या गर्दीत चोरट्यांची शोध मोहीम सुरु केली. स्थानिक नागरिक आणि काही भाविकही त्यांना मदत करू लागले.काही वेळातच ३-४ महिला आणि काही पुरुषांना पकडण्यात आले. तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते व पोसई जयेश गांगुर्डे, उमेश पतंगे, भरत धुमाळ, एकनाथ आव्हाड, श्रेणी पोसई पठाण, सफौ रमेश गांगर्डे, पोहेकॉ शैलेश सरोदे, गणेश लबडे, राहुल द्वारके, आबासाहेब झावरे, शरद वांढेकर, नितीन गांगुर्डे, राहुल थोरात, मंगेश खरमाळे, रविकिरण सोनटक्के, पोकॉ जयदत्त बांगर, संभाजी बोराडे, अशोक भताने, विशाल टकले, बाळू चव्हाण, विजय साठे, विक्रांत भालसिंग, राजू खेडकर महिला पोलीस कविता हरिश्चंद्र, मोहिनी कर्डक, गायत्री धनवडे, नंदिनी झीने, अर्चना राठोड, अर्चना जायभाय असे मोठ्या फौजफाट्यासह तेथे दाखल झाले. नागरिकांनी पकडलेल्या महिला व पुरुषांकडे कसून तपासणी केल्यावर काही महिलांकडे चोरलेले दागिने सापडले. तसेच त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेण्यात आला. या चोरट्यांच्या टोळीत एकूण १८ जणांचा समावेश असल्याचे समोर आले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
चोरट्यांच्या टोळीत ‘या’ आरोपींचा समावेश
या टोळी मध्ये चिरंजीव रमेश शिंदे (वय १८), प्रभाकर गंगाधर पवार (वय २६), आण्णा शिवाजी शिंदे (वय २८), गयाबाई शंकर शिंदे (वय ५६), अंजली मंगेश शिंदे (वय ३५), शांताबाई सुनिल जाधव (वय ६२), लक्ष्मी माधव पवार (वय ३२), रोहिणी किसन पवार (वय २५), प्रियांका अमोल शिंदे (वय ३०) गयाबाई राजेश पवार (वय ५५), अनिता अर्जुन शिंदे (वय ३२), शीला शंकर गायकवाड (वय ४५), सुनिता अनिल शिंदे (वय ४२), सरिता विलास शिंदे (वय ५२), हिराबाई रमेश शिंदे (वय ३०), रुपाली प्रभाकर पवार (वय २५), सपना कृष्णा शिंदे (वय २८), संगीता आण्णा शिंदे (वय २५) सर्व रा. गोंदी, ता.अंबड, जि. जालना यांचा समावेश आहे.
३ महिलांचे १ लाख ३५ हजारांचे दागिने हस्तगत
याबाबत कांचन सुधीर जाधव (वय २३, रा.अकोळनेर, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून या चोरट्यांच्या टोळी विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दागिने चोरीला गेल्याबाबत ४ महिलांनी पोलिसांना जबाब दिले असून त्यातील ३ महिलांचे १ लाख ३५ हजारांचे दागिने पोलिसांनी या चोरट्यांच्या टोळी कडून हस्तगत केले आहेत. एका महिलेचे दागिने हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. अजून कोणाचे दागिने या पारायण सोहळ्यातून चोरीला गेले असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन स.पो.नि. प्रल्हाद गिते यांनी केले आहे.