अहिल्यानगर (प्रतिनिधी):-संधिवंचित,आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या मुली-महिलांना संधी मिळावी, त्यांना सशक्त व स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने स्नेहालय संस्था केडगाव येथे सुरू केलेल्या सक्षमा प्रकल्पाच्या पहिल्या ‘बेड साईड असिस्टंट’ बॅचचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मुलींना केवळ रोजगारक्षम शिक्षण देणे नव्हे, तर त्या आत्मनिर्भर आणि समाजोपयोगी व्हाव्यात, यासाठी त्यांना पूर्णतः मोफत आणि निवासी स्वरूपात प्रशिक्षण दिले जात आहे.या शुभारंभ प्रसंगी स्नेहालय संस्थेच्या सचिव व आधारशिला असलेल्या प्रिती भोंबे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी उपस्थित लाभार्थी मुलींना बेड साईड असिस्टंट कोर्सचे व्यावसायिक महत्त्व, त्यानंतर उपलब्ध असलेल्या ए.एन.एम., जी.एन.एम.सारख्या उच्च आरोग्य सेवा कोर्सेससाठी आर्थिक मदतीची हमी, आणि शिक्षणाच्या पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना स्नेहालय संस्थेचे प्रेरणास्थान आणि अनिवासी प्रकल्पांचे संचालक हनिफ शेख यांनी केली. त्यांनी सक्षमा प्रकल्पाच्या उद्दिष्टांबाबत, कोर्सची रूपरेषा आणि प्रशिक्षण प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. लाभार्थींना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.आरोग्य सेवा क्षेत्रातील तज्ज्ञ व मार्गदर्शक राजश्री कुलकर्णी यांनी ‘बेड साईड असिस्टंट’ कोर्सचे स्वरूप, त्याचे आरोग्य क्षेत्रातले महत्त्व, बॅचसाठी आवश्यक नियम, व कोर्स पूर्ण केल्यानंतर असलेल्या स्थिर आणि सन्माननीय रोजगार संधींबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सक्षमा प्रकल्प समन्वयक दिपाली बुरडे यांनी तर आभार प्रदर्शन बालभवन प्रकल्प व्यवस्थापक उषा खोल्लम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खालील मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले:रेडिओ नगर स्टेशन प्रमुख संदिप क्षीरसागर,उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम,प्रियंका मते, पूजा दहातोंडे,उमेद प्रकल्प समन्वयक यास्मिन शेख,राणी मॅडम, स्नेहाधार प्रकल्प व्यवस्थापक विद्या घोरपडे,संजय नगर प्रकल्प प्रतिनिधी अंजली व्यास,कौशल्य विकास केंद्राचे सागर दोंदे इत्यादी उपस्थित होते.सक्षमा प्रकल्पाचा हा पहिला टप्पा म्हणजे अशा महिलांसाठी नव्या भविष्याची दारे उघडणारा प्रकाशस्तंभ ठरणार आहे.