अहिल्यानगर (प्रतिनिधी):- मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, ज्यांनी आधुनिक नर्सिंग व्यवसायाची पायाभरणी केली. या निमित्ताने आपण ग्रामीण भागातील नर्सेसच्या अमूल्य योगदानाची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर उपलब्ध नसलेल्या किंवा रुग्णालय दूर असलेल्या गावांमध्ये, नर्सेसच रुग्णांसाठी पहिले आणि कधी कधी एकमेव आरोग्य सेवा पुरवणारे आधार असतात.
नर्स म्हणजे फक्त परिचारिका नाहीत, त्या आरोग्य शिक्षिका, प्रसूती काळजीदार, लस देणाऱ्या, आणि संकटकाळात मदतीला धावून येणाऱ्या खऱ्या योद्धा आहेत. या सेवेच्या वाटचालीची प्रेरणा आपल्याला फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या जीवनातून मिळते. “द लेडी विथ द लॅम्प” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाईटिंगेल यांनी क्रिमीअन युद्धात जखमी सैनिकांची सेवा करून नर्सिंगला एक व्यावसायिक व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांच्यामुळेच आधुनिक नर्सिंग व्यवसायाची पायाभरणी झाली. ग्रामीण भागातील परिचारिकाचे काम कौतुकास्पद आहे : प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) आणि उपकेंद्रांमध्ये नर्सेस प्रसूती सेवा, बाल आरोग्य, आणि स्त्रियांचे आरोग्य संभाळतात. टीबी, पोलिओ, कुष्ठरोग, लसीकरण, कुटुंब नियोजन यांसारख्या राष्ट्रीय आरोग्य योजनांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. कोविड-१९ सारख्या महामारीत, त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा दिली. नर्सिंग हे केवळ एक व्यवसाय नाही, तर एक सेवाभाव आणि मानवीय संवेदनांनी परिपूर्ण असलेली शिस्त आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये नर्सेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रुग्णाच्या आजारपणाच्या काळात त्याच्या शरीराबरोबरच मनाचीही काळजी घेणारा, त्याला धीर देणारा आणि उपचार प्रक्रियेत एक महत्वाचा दुवा ठरणारा नर्स हा आरोग्य व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे.
आजच्या गतिमान जीवनशैलीमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे, अशा परिस्थितीत नर्सेस केवळ औषधोपचार देणारे नाहीत, तर ते आरोग्य शिक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना, मानसिक आधार व समाजातील आरोग्य जागरूकता वाढवण्याचे कार्यही करतात. महामारीच्या काळात नर्सेसनी आपल्या कार्यकर्तृत्वाने हे दाखवून दिले की त्यांची भूमिका फक्त रुग्णालयापुरती मर्यादित नसून ती समाजाच्या सर्व स्तरांवर प्रभाव टाकणारी आहे.नर्सेसचा सन्मान करूया: आपल्या गावातील नर्सला धन्यवाद द्या. आपल्या मुलींना व मुलांना नर्सिंग हे सेवेचं, आदरणीय आणि सुरक्षित भविष्य देणारं क्षेत्र आहे हे समजावून सांगा व ह्या क्षेत्राची निवड करण्यास प्रोसाहन द्या. नर्सेससाठी चांगल्या प्रशिक्षणाची, निवासाची आणि सन्मानाची गरज आहे. नर्सिंग व्यवसाय हा सहानुभूती, तांत्रिक कौशल्य, निर्णयक्षमता आणि सततच्या शिक्षणावर आधारलेला आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य प्रशिक्षण आणि सतत अद्ययावत राहण्याची आवश्यकता असते. आज नर्सेस केवळ “रुग्णसेवक” म्हणून काम करत नाहीत, तर ते नेते, शिक्षक, संशोधक आणि धोरणनिर्माते म्हणूनही आरोग्य व्यवस्थेचा भाग बनले आहेत. त्यामुळेच, नर्सिंग व्यवसायाचे महत्त्व समाजाने ओळखणे, त्यांचा सन्मान करणे आणि या व्यवसायात नव्या पिढीला सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे.
या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनी “ग्रामीण नर्सेस, सेवेबद्दल आम्हाला अभिमान आहे – आम्ही तुम्हाला सलाम करतो!”
“द लेडी विथ द लॅम्प” फ्लॉरेन्स नाईटिंगेल