‘महाडीबीटी’वर अर्ज करा आणि खरीप हंगामात उत्पादकता वाढवा! कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन… राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पीक प्रात्यक्षिके, बियाणे आणि मिनी किटचा मिळणार लाभ!
संगमनेर (प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव):-अहिल्यानगर जिल्ह्यात कृषी विभागाकडून खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली असून संगमनेर तालुक्यात विविध महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत (सन २०२६-२७) अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया योजना) या अंतर्गत पीक प्रात्यक्षिकांसाठी, प्रमाणित बियाणे वितरण व मिनी किट वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि संबंधित गटांनी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी केले आहे.
आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा कृषी विभागाचा मानस
खरीप हंगामातील कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, भरडधान्य आणि तेलबिया आदी पिकांची उत्पादकता वाढवणे, तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. यासाठी कृषी विभागामार्फत पीक प्रात्यक्षिके प्रकल्प राबवले जाणार असून, प्रमाणित बियाणे व फ्री मिनी किटचे वाटप केले जाणार आहे.
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ आणि पात्रता निकष
या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनामार्फत नोंदणीकृत असलेले शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांना अर्ज करता येणार आहे. लाभार्थ्यांची निवड ही ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाईल.
⚠️ महत्त्वाची अट: अर्ज करणाऱ्या वैयक्तिक शेतकऱ्यांकडे तसेच लाभ घेणाऱ्या गटातील सर्व सदस्यांकडे ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) असणे बंधनकारक आहे. तसेच, ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना पुढील दोन वर्षे याचा पुन्हा लाभ घेता येणार नाही.
येथे साधा संपर्क:
इच्छुक शेतकरी व गटांनी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahadbt.maharashtra.gov.in) जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांच्या कार्यालयाशी, कृषी सहाय्यक शिंदे किंवा हिवरगाव पावसा ग्रामपंचायत प्रशासक सुभाष गडाख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
