काकडवाडी हद्दीतील पालखी रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम तातडीने मार्गी लावा..ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय घोलप व ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी..! दिला आंदोलनाचा इशारा…
संगमनेर (प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावच्या हद्दीतील पालखी मार्ग रस्त्याचे डांबरीकरण होऊन अनेक दिवस उलटले आहेत.मात्र,संबंधित ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या भरण्याचे काम अजूनही रखडलेले आहे. आगामी महिनाभरात या मार्गावरून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे जाणारी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काकडवाडी गावात आगमन करणार आहे.या पार्श्वभूमीवर पालखी येण्यापूर्वी रस्त्याची उर्वरित सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते,रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष तथा संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप आणि काकडवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
काकडवाडी हद्दीतील या पालखी मार्गाचे डांबरीकरण पूर्ण झाले असले,तरी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईडपट्ट्या अजूनही भरण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.याशिवाय,वाहन चालकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक असलेले दिशादर्शक बोर्ड आणि किलोमीटरचे नंबर (अंक) देखील अद्याप लावण्यात आलेले नाहीत.ठेकेदाराच्या या अर्धवट आणि निष्काळजी कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.या गंभीर समस्येबाबत पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी राहुल गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना सविस्तर माहिती दिली आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाने तातडीने संबंधित ठेकेदाराला कडक सूचना देऊन रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अवघ्या एका महिन्यात काकडवाडी गावात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यात हजारो वारकरी,दिंड्या आणि वाहनांचा मोठा ताफा असतो.
अशा वेळी रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यास वारकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल आणि अपघाताचा धोकाही वाढेल.त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता, पालखी सोहळा गावात येण्यापूर्वी साईडपट्ट्या भरणे, दिशादर्शक फलक लावणे आणि किलोमीटरचे बोर्ड लावणे ही कामे तातडीने मार्गी लावावीत, अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र पावले उचलावी लागतील, असा इशारा पत्रकार दत्तात्रय घोलप व काकडवाडी येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
