जाफर गेटवरील सरकारी जमिनीची लूट थांबवा..रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने मनपा प्रशासनाला दिला ‘हा’ ‘अंतिम इशारा’
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-जाफरगेट जवळील कल्याण शाह बाबा मशीद (दर्गा) परिसरातील महानगरपालिकेच्या कोट्यवधींच्या मौल्यवान जागेवर भू-माफियांनी उभारलेले बेकायदेशीर पत्र्याचे गोडाऊन तात्काळ जमीनदोस्त करा, अन्यथा २५ मे २०२६ पासून महानगरपालिका कार्यालयासमोर ‘आमरण उपोषण’ सुरू करण्यात येईल, असा थेट आणि अंतिम इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आला आहे.या आंदोलनात स्थानिक पीडित गरीब व्यापाऱ्यांनाही सोबत घेण्यात येणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,जाफर गेट परिसरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक छोटे व्यावसायिक आणि गरीब दुकानदार आपला व्यवसाय करून प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करत आहेत.मात्र,काही दिवसांपासून स्थानिक भू-माफिया आणि असामाजिक तत्त्वांनी या शासकीय जागेवर बेकायदेशीर ताबा सांगण्यास सुरुवात केली आहे.प्रशासनाने यापूर्वी जेसीबीच्या साहाय्याने जे अतिक्रमणाचे पत्रे उपसून टाकले होते,ते या माफियांनी प्रशासनाला उघड आव्हान देत पुन्हा एकदा त्या जागेवर ठोकले आहेत.अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे,आता या भू-माफियांनी केवळ पत्रे ठोकण्यापुरते मर्यादित न राहता, महानगरपालिकेच्या त्या संपूर्ण जागेवर अत्यंत दंडेशाहीने एक ‘मोठे बेकायदेशीर गोडाऊन’ उभे केले आहे.प्रशासनाच्या शासकीय जमिनीवर एवढे मोठे अवैध गोडाऊन उभारले जाणे,हा थेट मनपा प्रशासनाचा आणि कायद्याचा अवमान असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या गंभीर प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाने गेल्या १५ मे २०२६ रोजी मनपा प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणी करून सदर बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करण्यासाठी व भू-माफियांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली होती. परंतु, ७ दिवस उलटून गेले तरी महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई केलेली नाही. प्रशासनाच्या या संशयास्पद ढिसाळ आणि उदासीन भूमिकेमुळे भू-माफियांचे मनोधैर्य गगनाला भिडले असून, गरीब व्यापाऱ्यांच्या उपजीविकेवर गदा आली आहे.
२४ मे पर्यंत कारवाई न झाल्यास २५ तारखेला ‘आरपारची लढाई’
प्रशासनाने शासकीय जमिनीच्या संरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे पक्षाने आता आंदोलनाचा आक्रमक मार्ग स्वीकारला आहे.रविवार, २४ मे २०२६ पर्यंत: सदर जागेवरील बेकायदेशीर गोडाऊन व अतिक्रमण जमीनदोस्त करून संबंधित भू-माफियांवर शासकीय जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत.कारवाई न झाल्यास सर्व पीडित व्यापाऱ्यांसह महानगरपालिका कार्यालयासमोर ‘आमरण उपोषण’ सुरू करण्यात येईल.“या आमरण उपोषणादरम्यान कोणत्याही आंदोलकाच्या जीवितास बरे-वाईट झाल्यास, प्रकृती खालावल्यास अथवा कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित विभागाची राहील,” असा कडक इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे यांनी दिला.हे स्मरण पत्र देताना पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,जिल्हा सचिव रवि मोरे, कामगार आघाडीचे शहर अध्यक्ष संतोष उनवणे,ज्येष्ठ प्रकाश घोरपडे,मध्य शहराध्यक्ष राहुल खरात,सुनील वाहुळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
