शिक्षकांच्या गळ्यात यशाची माळ,संघर्षाचा सन्मान! बीडमध्ये ‘प्रहार’ अन् ‘मुस्लिम सेवा संघा’ चा ऐतिहासिक सोहळा मुमताज सय्यद मॅडमांच्या अंगणात रंगला आनंदाचा सोहळा..!
बीड (प्रतिनिधी):-बीडच्या शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक वर्तुळात सध्या एकाच बातमीची जोरदार चर्चा रंगली आहे.’प्रहार शिक्षक संघटना’ आणि ‘मुस्लिम सेवा संघ’ या दोन बलाढ्य संघटनांचे दिग्गज नेते आज एकाच छताखाली एकत्र आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.निमित्त होतं एका भव्य आणि महत्त्वपूर्ण सत्कार सोहळ्याचे!दि.८ जुलै २०२६ रोजी प्रहार शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष तथा मुस्लिम सेवा शिक्षण व इतर कर्मचारी विभागाच्या राज्य अध्यक्षा मुमताज सय्यद यांच्या निवासस्थानी हा हाय-प्रोफाइल सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्यात नवजीवन पतसंस्थेचे नामांकित डायरेक्टर गोविंद वायकर सर यांची अशोक नगर केंद्रप्रमुख पदी पदोन्नती (प्रमोशन) झाल्याबद्दल त्यांचा प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव करत विशेष सत्कार करण्यात आला.त्याच वेळी,प्रहार संघटनेचे धडाडीचे नेते शेख रहीम सर यांनी मुस्लिम सेवा संघात जाहीर प्रवेश केला.
त्यांच्या या ‘महा-प्रवेशा’मुळे मुस्लिम सेवा संघाची ताकद दुप्पट झाली असून,या प्रवेशाबद्दल त्यांचाही भव्य सत्कार करण्यात आला.शिक्षकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अहोरात्र झटणारे,प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश तांदळे सर यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती होती.त्यांच्या याच अथांग संघर्षाचा सन्मान म्हणून संपूर्ण उपस्थित नेत्यांच्या वतीने तांदळे सरांचाही जंगी सत्कार करण्यात आला.या ऐतिहासिक प्रसंगी मुस्लिम सेवा संघाचे प्रदेश महासचिव फिरदोस सर,रियाज सिद्दिकी सर,शेख सलीम,माजेद खान आदी बड्या नेत्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.सत्कारमूर्तींच्या कार्याचा आढावा घेत,माजी नगरसेवक, ज्येष्ठ पत्रकार तथा मुस्लिम सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष फारुख मन्यार सर यांनी आपल्या ओघवत्या आणि धारदार शैलीत सर्वांचे शब्दसुमनांनी गुणगौरव केले. कार्यक्रमाचा शेवट अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात झाला असून,उपस्थितांचे आभार प्रदर्शन रियाज सिद्दिकी सर यांनी मानले.या दोन्ही संघटना एकत्र आल्याने भविष्यात शिक्षकांचे प्रश्न सुटण्यास मोठी गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
