‘कोट्यवधींचे जलशुद्धीकरण केंद्र की मातीचा कारखाना?’ गढूळ पाण्याच्या बाटल्या घेऊन रणरागिणी थेट अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसल्या;कराड पंचायत समितीत थरार!
प्रशासनाला घाम फुटला..!
कराड (विशेष प्रतिनिधी):-जनतेच्या आरोग्याशी चाललेला खेळ आता आम्ही अजिबात खपवून घेणार नाही!” असा थेट इशारा देत बनवडी (ता.कराड) येथील संतप्त महिलांनी आज कराड पंचायत समितीत थेट ‘अॅक्शन मोड’ दाखवला.गावातील नळांना येणाऱ्या दूषित आणि चिखलमय गढूळ पाण्याच्या बाटल्या हातात घेऊन महिलांनी थेट ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ‘पाटील सर’ यांचे दालन गाठले.महिलांच्या या अचानक आणि आक्रमक पवित्र्यामुळे काही काळ पंचायत समिती परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र,रणरागिणींच्या या न्याय्य हक्काच्या एकजुटीपुढे अखेर प्रशासनाला झुकावे लागले आणि अवघ्या एका तासात संपूर्ण यंत्रणा हलवून युद्धपातळीवर कारवाई सुरू करण्यात आली.बनवडीकरांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.गावात कोट्यवधी रुपये खर्च करून अतिशय दिमाखात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.असे असतानाही ग्रामस्थांना पिण्यासाठी माती आणि चिखलमिश्रित पाणी का पुरवले जात आहे? हा तिखट आणि रोकठोक जाब महिलांनी उपअभियंत्यांच्या टेबलवर गढूळ पाण्याच्या बाटल्या ठेवून विचारला. “करदात्या जनतेला जर असे विषारी पाणी पिण्याची वेळ येत असेल,तर त्या कोट्यवधींच्या प्रकल्पाचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल विचारत महिलांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
महिलांचा आक्रमक आणि कायदेशीर पवित्रा पाहून अखेर जबाबदार अधिकाऱ्यांना या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेणे भाग पडले.महिलांच्या या आक्रमक आंदोलनानंतर कराड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (BDO) आणि उपअभियंता पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ चक्रे फिरवलली. वरिष्ठांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाच्या एम.पी.डब्ल्यू. (MPW) कर्मचाऱ्यांनी तातडीने बनवडी गावात धाव घेत पाण्याचे कायदेशीर सॅम्पल्स घेतले.तातडीची उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने गावात घरोघरी जाऊन पाणी शुद्धीकरणाचे ‘रुद्र जल’ हे औषध वाटप करण्यास तात्काळ सुरुवात करण्यात आली.बनवडीत शुद्ध आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनामार्फत तातडीने तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.जनतेच्या अत्यंत गंभीर अशा आरोग्याच्या प्रश्नावर तात्काळ आणि सकारात्मक पावले उचलल्याबद्दल आंदोलक महिलांनी कराड पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.मात्र, त्याच वेळी प्रशासनाला इशाराही दिला आहे.
”प्रशासनाने केलेली कारवाई स्वागतार्ह आहे,पण अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की ही फक्त पहिली पायरी आहे.बनवडीतील प्रत्येक नागरिकाला जोपर्यंत नळाला कायमस्वरूपी आणि शुद्ध पाणी मिळत नाही, तोपर्यंत आमचे या संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष असेल.पुन्हा निष्काळजीपणा झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा आंदोलक महिलांनी दिला आहे.या धाडसी आणि यशस्वी आंदोलनाचे नेतृत्व आदिशक्ती महासंघाच्या संस्थापक अश्विनीताई वेताळ-पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या माधुरीताई टोणपे,आदिशक्ती महासंघाच्या कराड तालुका अध्यक्षा सविता काशीद,आणि वैशालीताई कोरे यांनी केले.या आंदोलनात बनवडीतील इतरही अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.महिलांच्या या एकजुटीचे आणि धाडसाचे सध्या कराड तालुक्यात कौतुक होत आहे.
