विद्यार्थी धोक्यात..! ‘या’ सरकारी शाळेचे लोखंडी गेट तोडून अज्ञातांचा धुमाकूळ;जिल्हाधिकाऱ्यांचा थेट आदेश गुन्हा दाखल..
अहिल्यानगर (जामखेड):-जामखेड येथील आरोळेनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेच्या आवारातील नवीनच बसवलेले लोखंडी प्रवेशद्वार अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या अंधारात तोडून शासकीय मालमत्तेची नासधूस केली आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.शासकीय निवासी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) नुकतेच म्हणजेच २ जुलै रोजी शाळेच्या पूर्व बाजूस एक भक्कम लोखंडी गेट बसविण्यात आले होते.मात्र हे गेट बसवल्याचे काही समाजकंटकांच्या डोळ्यात खुपले.त्याच रात्री अज्ञात व्यक्तींनी सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत गेटचे कुलूप तोडले आणि गेट बाजूला ढकलून दिले.यामध्ये शासनाचे सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दुसऱ्या दिवशी सकाळी सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर शाळेत एकच धावपळ उडाली.
पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे , हवालदार संजय लोखंडे हे कसून तपास करत आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत शाळेचे मुख्याध्यापक राहुल दळवी यांनी तातडीने जामखेड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम,१९८४ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS) मधील संबंधित कलमान्वये अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय लोखंडे करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याच शासकीय परिसरात अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. मात्र, या परिसरात काही स्थानिक नागरिकांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत.आवारातून अनधिकृतपणे ये-जा करणे.आवाराचा बेकायदेशीर वाहनतळ (पार्किंग) म्हणून वापर करणे.परिसरात कचरा टाकणे आणि सांडपाणी सोडणे.शासकीय संरक्षक भिंतीचे व मालमत्तेचे नुकसान करणे.असे प्रकार येथे नित्याचेच झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे,या अनधिकृत प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना स्थानिक गुंडांकडून धमकावण्याच्या घटनाही घडल्या आहेत,ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांना पत्राद्वारे तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे. या पत्रात शासकीय परिसरात दिवस-रात्र पोलीस गस्त वाढविणे, अनधिकृत वावरास पूर्णपणे प्रतिबंध करणे आणि विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गंभीर दखल घेतली असून, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे आता पोलीस या गुंडांच्या मुसक्या कधी आवळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
