अहिल्यानगर..शेतकऱ्यांनो आणि नागरिकांनो सावधान..! पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे;प्रशासनाने जारी केला ‘हाय अलर्ट’
अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी):-हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कमालीची सतर्कता दाखवत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक नियमावली (ॲडव्हायझरी) जारी केली आहे. ‘कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,’ असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.
शेतकरी बांधवांनो, आधी शेतीमाल आणि जनावरे सुरक्षित करा! सध्या बाजारात शेतीमाल विक्रीची लगबग सुरू आहे. मात्र, अचानक येणाऱ्या पावसामुळे मोठे नुकसान होऊ शकते.
त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना खालील गोष्टी तातडीने करण्याचे आवाहन केले आहे:
शेतीमालाची सुरक्षा: शेतकऱ्यांनी आपला काढणी केलेला शेतीमाल तातडीने सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.
बाजार समितीतील काळजी: बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला किंवा आगामी काळात आणण्याचे नियोजन असलेला माल पावसात भिजणार नाही, याची पूर्ण दक्षता घ्यावी.
जनावरांची सुरक्षा: पाळीव जनावरांना तात्काळ सुरक्षित आणि पक्क्या छताखाली हलवावे. विजांच्या कडकडाटात त्यांना उघड्यावर अथवा झाडाखाली बांधणे टाळावे.
प्रशासनाकडून ‘या’ ६ नियमांचे पालन करण्याचे आवाहन
नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाच्या खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. याचे उल्लंघन करणे जीवावर बेतू शकते:
झाडांचा आसरा घेऊ नका: मेघगर्जना व वीज चमकत असताना विसरूनही झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका. वीज अंगावर पडण्याचा धोका सर्वात जास्त येथेच असतो.
विद्युत यंत्रणेपासून दूर राहा: विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर, मोबाईल टॉवर, धातूचे कुंपण आणि लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा.वादळात बाहेर पडणे टाळा: वादळी वाऱ्याच्या वेळी कोसळणारी झाडे, मोठे होर्डिंग्ज व जीर्ण इमारतींच्या परिसरात जाणे किंवा त्यांच्या खाली वाहन उभे करणे टाळा.
पाण्याजवळ जाऊ नका: मुसळधार पावसात धरण, नदी, ओढे व कालव्यांमध्ये उतरू नका. विशेषतः तरुण वर्गाने पूर पाहण्यासाठी किंवा धोकादायक ठिकाणी ‘सेल्फी’ काढण्यासाठी गर्दी करू नये.
घरातच राहा, सुरक्षित राहा: वादळ सुरू असताना शक्यतो घराबाहेर पडणे टाळा आणि घरातील विद्युत उपकरणांचा (टीव्ही, फ्रीज, मोबाईल चार्जिंग) वापर मर्यादित ठेवा किंवा प्लग काढून ठेवा.
आपत्कालीन मदतीसाठी २४ तास यंत्रणा सज्ज: कोणत्याही संकटाच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधा. मदतीसाठी प्रशासनाने ११२ आणि १०७७ हे आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून ते २४ तास कार्यरत राहतील.
”हवामानाचा लहरीपणा पाहता नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.”
— जिल्हा प्रशासन, अहिल्यानगर.
