स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह ‘या’ चौघांना ठोकल्या बेड्या;मध्यप्रदेशातून आणलेला कट्टा विकण्याचा डाव फसला
अहिल्यानगर श्रीरामपूर (विशेष प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी अत्यंत कडक मोहीम उघडली आहे.वाकडी रोड,श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका धाडसी कारवाईत फिल्मी स्टाईलने सापळा रचून मारुती इर्टिगा गाडीतून गावठी कट्टा (अग्निशस्त्र) आणि दोन जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या चार सराईत आरोपींना रंगेहात अटक केली आहे.पोलिसांनी आरोपींकडून एकूण ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून,या कारवाईमुळे अवैध शस्त्रे पुरवणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना जिल्ह्यातील अवैध शस्त्रांची तस्करी व विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.या आदेशान्वये एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व त्यांच्या विशेष पथकाची स्थापना करून त्यांना रवाना करण्यात आले होते.
हे पथक ६ जुलै २०२६ रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना,गुप्त बातमीदाराकडून एक अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की,काही तरुण पांढऱ्या रंगाच्या मारुती इर्टिगा गाडीतून बेकायदेशीर गावठी कट्टा विक्री करण्यासाठी वाकडी गावाकडून श्रीरामपूरच्या दिशेने येत आहेत.माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने वाकडी रोडवरील यशवंत बाबा चौक, विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ रोडवर सापळा रचला.काही वेळातच संशयित इर्टिगा गाडी (क्र. MH 48 AK 7763) श्रीरामपूरच्या दिशेने येताना दिसली.पोलिसांनी चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला आणि गाडी थांबताच चहूबाजूंनी वेढा घालून गाडीतील चारही जणांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सागर दत्तु उपळकर (वय २८ वर्षे,चालक),विशाल रामकिसन गुंजाळ (वय २६ वर्षे),ऋतीक भगवान गुंजाळ (वय २५ वर्षे),पवन गोरख उपळकर (वय २७ वर्षे)
(सर्व राहणार -रामपूर,ता. श्रीरामपूर,जि.अहिल्यानगर). अशी सांगितली.ताब्यात घेतलेल्या आरोपींची आणि वाहनाची झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी पिस्तूल (अग्निशस्त्र): ०१ नग (किंमत अंदाजे ४०,०००/- रुपये)
जिवंत काडतुसे: ०२ नग (किंमत अंदाजे ४,०००/- रुपये)मोबाईल व रोख रक्कम: ०३ मोबाईलसह एकूण ५१,४००/- रुपये
चारचाकी वाहन: मारुती इर्टिगा कार (किंमत अंदाजे ५,००,०००/- रुपये)
एकूण जप्त मुद्देमाल: ५,९५,०००/- रुपये (पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या बेकायदेशीर अग्निशस्त्राबाबत पोलिसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता,त्यांनी हे शस्त्र चक्क मध्यप्रदेशातून खरेदी करून श्रीरामपूर परिसरात विक्रीसाठी आणल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.
यावरून या गुन्ह्याचे धागेदोरे आंतरराज्यीय शस्त्र तस्करीशी जोडले गेल्याचे स्पष्ट होत आहे.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आत्तार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७५/२०२६ नुसार आर्म्स ॲक्ट कलम ३, ७ / २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.सदरची धडाकेबाज कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या थेट सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार फुरकान शेख,रिचर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव,रमिजराजा आतार,भगवान थोरात आणि प्रशांत राठोड यांच्या संपूर्ण जाबांज पथकाने केली आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
