दक्षिणेत एकच खळबळ! तब्बल १७७ जणांना प्रशासनाने घेतले रडारवर एका चुकीमुळे मोजावे लागणार लाख रुपये..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेतीचा वाद, पाण्याचा कज्जा,शेजाऱ्यांशी भांडण किंवा जमिनीची हुज्जत…आता अशा भांडखोर प्रवृत्तींना श्रीगोंदा पोलीस आणि महसूल प्रशासनाने थेट ‘दणका’ दिला आहे.भविष्यात तालुक्यात कोणतेही गंभीर गुन्हे घडू नयेत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी प्रशासनाने एक अत्यंत धाडसी आणि मोठी ‘विशेष प्रतिबंधात्मक मोहीम’ हाती घेतली आहे.या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाबे दणाणले आहेत.चालू वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२६ ते १२ जून २०२६ या कालावधीत श्रीगोंदा तालुक्यात शेती,पाणी,शेजार आणि जागेच्या कारणावरून अनेक दखलपात्र व अदाखलपात्र गुन्हे दाखल झाले होते.या प्रकरणांचा आढावा घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलूबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी मोहीम आखण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुजितकुमार क्षिरसागर यांच्या देखरेखीखाली पोलीस आणि तहसीलदार कार्यालयाने एकत्र येत ही कारवाई पूर्ण केली.
मागील सहा महिन्यांत श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयात २९६ प्रतिबंधात्मक प्रस्ताव (बी.एन.एस.एस. कलम १२६) दाखल होते,मात्र त्यांच्या नोटिसा बजावण्याचे काम प्रलंबित होते.तहसीलदार श्री. सचिन डोंगरे आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून तातडीने हालचाली करत नवीन ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ (BNSS) कलम १३० अंतर्गत २९६ नोटिसा तयार करण्यात आल्या.श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या सर्व बीट अंमलदारांनी रात्रं-दिवस एक करून यापैकी २६६ नोटिसा थेट संबंधित व्यक्तींच्या हातात अत्यंत यशस्वीपणे बजावल्या. तसेच या सर्वांना न्यायालयात उपस्थित राहून प्रत्येकी १,००,०००/- (एक लाख) रुपयांचा जातमुचलका आणि एक जामीनदार सादर करण्याचे कडक निर्देश दिले होते.
या मोहिमेला आज मोठे यश आले.प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे घाबरलेल्या १७७ प्रतिवाद्यांनी आज आपल्या जामीनदारांसह स्वतःहून हजेरी लावली.या सर्वांनी बी.एन.एस.एस.कलम १३६ अंतर्गत १ लाख रुपयांचा अंतिम जातमुचलका (बॉन्ड) प्रशासनाकडे यशस्वीपणे सादर केला आहे.म्हणजेच, आता जर यांनी भविष्यात कुठेही भांडण किंवा वाद घातला,तर थेट १ लाखाचा दंड आणि तुरुंगवास निश्चित असणार आहे.आज १७७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण झाली असली,तरी मोहीम संपलेली नाही.नोटिसा बजावलेले उर्वरित ८९ संशयित अजूनही बाकी आहेत. त्यांच्यावरही ही प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण करण्यासाठी आम्ही उद्याही ही विशेष मोहीम तीव्र गतीने सुरूच ठेवणार आहोत. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक.संजय ठेंगे,सपोनि. गणेश अहिरे,पो.उप.निरीक्षक सचिन लिमकर,मनोहर खिळदकर,संजय वाघमारे, पवन मोहिते आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या सर्व बीट अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले. पोलिसांच्या या ‘अॅक्शन मोड’मुळे श्रीगोंद्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून सामान्यांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला आहे.
